"गोदापार्क'वर बहरला "सकाळ-कलांगण'चा दुसरा वर्धापन दिन

नाशिक - एकीकडे नाशिककरांना थंडीची हुडहुडी भरलेली असतांना, दुसरीकडे भल्या सकाळी गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील गोदापार्कवर कलाकारांनी उत्साहवर्धक सादरीकरणाने माहोल तयार केला होता. चित्र रेखाटनासह गायन, वादन, नृत्यासह हास्यरेषांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. "सकाळ-कलांगण' उपक्रमाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नाशिककरांमध्ये ऊर्जा भरली.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार, सुयोजित बिल्डकॉमचे संचालक अनील जैन, ज्येष्ठ चित्रकार भि. रा. सावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत आदी उपस्थित होते.

प्रारंभी नाशिक म्युझिक क्‍लबच्या कलाकारांनी सादरीकरणास सुरवात केली. राजेंद्र भदाणे यांनी बासरी वादनातून गणेश वंदना सादर केली. यानंतर मुकुंद बोरसे, प्रमोद कापडणे, संजय निकम, पुजा नागले, सीमा जाधव यांनी हिंदी, मराठी गीत सादर करतांना उपस्थितांचे निखळ मनोरंजन केले. यानंतर किर्ती कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर करतांना उपस्थितांची मने जिंकली. नऊ वर्षीय देविका पाटोळे हिचे नृत्याने उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळवली. कार्यक्रमास उपस्थित जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचे अर्कचित्र (कॅरीकेचर) रेखाटण्यासोबत हास्यरेषांचे सादरीकरण केले. मुंबई येथे आर्किटेक्‍चर अभ्यासक्रमात शिकत असलेल्या आकांक्षा जैन हिने मनोगत व्यक्‍त करतांना अनुभव कथन केले. चीन, अमेरीका, युरोपीय देशांमध्ये फिरतांनाची निरीक्षणे तिने सांगितली.

एकीकडे विविध कलांचे सादरीकरण होत असतांना दुसरीकडे दिग्गज चित्रकारांनी परीसरात ठाण मांडतांना गोदाकाठचे सौंदर्य कॅनव्हासवर उतरविले. गोदापार्कवरुन समोर दिसणारे गोदापात्र, हिरविगार झाडांसह निसर्गरम्य वातावरणाने चित्रकमांमध्ये उर्मी भरली होती. हौशी चित्रकारांनीही चित्र रेखाटनाचा, सोबत दिग्गजांचे चित्र साकारतांनाचा अनुभव घेतला.

नाशिक हे राज्यातील सांस्कृतिक केंद्र असून विविध कलांची परंपरा आहे. "सकाळ'ने विविध सामाजिक उपक्रमांत आपला ठसा उमटविला आहे. "सकाळ-कलांगण' उपक्रमातूनही युवा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य घडते आहे.
- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com