Jalgaon News : कमी भाडे दिल्याने मुलासह तीन प्रवाशांना बसमधून उतरविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

Jalgaon News : कमी भाडे दिल्याने मुलासह तीन प्रवाशांना बसमधून उतरविले

अमळनेर (जि. जळगाव) : राज्य परिवहन महामंडळ (ST) एका बाजूला चांगल्या सुविधा देण्याचा तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी त्यात बसण्याचे आवाहन करते,

परंतु २० रुपये भाडे कमी असल्याने वाहकाने लहान मुलासह तिघांना बसमधून उतरविल्याने अमळनेर आगारात वाहकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. (3 passengers including child were dropped from bus due to paying less fare jalgaon news)

धुळे येथील साबीर शेख आणि त्यांची पत्नी रोजिना त्यांच्या ५ वर्षाच्या मुलासह अमळनेर बसस्थानकावरून धुळे आगाराच्या बसमध्ये (क्रमांक ३७४६) मंगळवारी (ता. २८) रात्री नऊच्या सुमारास अमळनेर येथून चढले.

तिकीट काढण्याची वेळ आली तेव्हा शेख यांच्याकडे भाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर शेख यांनी ऑनलाइन भाडे घेण्यास सांगितले. त्याला नकार देण्यात आला. शेख यांनी उर्वरित २० रुपये भाडे धुळे बसस्थानकावर भरण्यास सांगितले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

मात्र वाहकाने त्यांचे म्हणणे न ऐकता अमळनेर शहरापासून काही अंतरावर बस थांबवून रात्री नऊला लहान मुलासह खाली उतरविले. सुदैवाने कुटुंबप्रमुख कुटुंबासोबत होते, अन्यथा रात्रीच्या अंधारात एखादी अप्रिय घटना घडू शकली असती. त्यानंतर त्यांनी नातेवाईकाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

याबाबत शेख यांच्या नातेवाईकाने अमळनेर आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्याकडे बसच्या (बिल्ला क्रमांक ३७७३) वाहकाविरुद्ध तक्रार करून कठोर कारवाईची विनंती केली आहे. तत्काळ कारवाई न केल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येईल, असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.

"संबंधित तक्रार धुळे आगाराला वर्ग करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडून वाहकाची चौकशी करण्यात येईल." - इम्रान पठाण अमळनेर, आगारप्रमुख