
भरधाव येणाऱ्या कारने महामार्गाशेजारील शेतात शौचास बसलेल्या दोन ग्रामस्थांना चिरडल्याची घटना घडली.
जळगाव : पहाटे पहाटे शेतात जेव्हा भरधाव कार घुसते आणि गावावर शोककळा पसरते अशी घटना जळगाव शहराजवळील पाळधी येथे आज झाली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर घटनास्थळी चालकाने कार सोडून पळ काढला. पाळधी पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आवश्य वाचा- पंजाब मधून आले आणि ८ गावठी कट्टे खरेदी केले ? पण पुढे असे घडले -
अशी झाली घटना...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर भावसार (वय ५०, रा. सोनारवाडा, पाळधी, ता. धरणगाव) आणि गावातीलच शेख मुक्तार शेख उस्मान (६०, रा. कसाईवाडा, पाळधी) हे दोघे मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास गावाच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र स्वॉमिलजवळ शौचास बसले होते. जळगावकडून पाळधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट शेतात शिरून दोघांना धडक दिली. यात प्रभाकर भावसार जागीच ठार झाले, तर शेख मुक्तार गंभीर जखमी झाले.
चालक गाडी सोडून फरार
अपघात होताच चालकाने कार सोडून पळ काढला. दरम्यान, घटना घडताच नागरिकांची मोठी गर्दी केली. दोघांना जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यात प्रभाकर भावसार मृत झाल्याची घोषणा डॉ. संदीप पाटील यांनी केली, तर जखमीस उपचारार्थ दाखल करण्यात आले.
आवर्जून वाचा- शासकीय दरात वाळू मिळणार; २१ वाळू गटांचे लिलाव
मृत प्रभाकर भावसार आचारी असून, मोठ्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्याचे काम करतात. त्यांच्या मागे पत्नी अरुणा, आई चिंधाबाई, दीपक आणि कल्पेश हे दोन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी पाळधी पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पाळधी पोलिस ठाण्याचे कर्मचारी तपास करीत आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे