
पोलिसांनी तपास चक्रे गतिमान केली. अवघ्या काही तासात ही गाडी शोधण्यात पोलिसांना यश मिळाले.
पाचोरा : सामनेर (ता पाचोरा) येथील महात्मा गांधी विद्यालया समोर महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघा महिलांना ता 2 रोजी भल्या पहाटे चिरडून फरार झालेल्या इनोवा कार चालकाचा पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही तासात शोध लावला. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या या अफलातून कामगिरीचे कौतुक होत आहे.
आवश्य वाचा- अधिकारी माणसातील अशीही माणूसकी..!
सामनेर येथील मनीषा पाटील व अनिता पाटील या मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघी महिलांचा भरधाव वाहनाच्या धडककेने मृत्यू झाला होता. या महिलांचा जीव घेऊन अज्ञात वाहन चालक पसार झाला होता. पोलिसांनी या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर येऊन पाहणी केली होती. अपघातस्थळावरून धडक देणाऱ्या गाडीच्या स्पेअर पार्टचे तुकडे पोलिसांनी पुरावा म्हणून जमा केले.
स्पेअर पार्टचे तुकड्यावरून सुरू झाला शोध
त्या आधारे पोलीस उपअधीक्षक भारत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल मोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलीस हवालदार प्रभाकर पाटील, विनोद बेलदार, निलेश गायकवाड यांनी तपास चक्रे गतिमान केली. अवघ्या काही तासात ही गाडी शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. एम एच 19 सीएफ 999 या क्रमांकाच्या कारने या महिलांना चिरडल्याचे निष्पन्न झाले असून हे वाहन वंदना बोरसे यांच्या नावाने आहे.
आवर्जून वाचा- अन् ‘तिला’ मिळाले जगण्याचे बळ !
जळगावला कार दुरुस्तीसाठी केली जमा
कार चालकाने दोघा महिलांना चिरडल्यानंतर सदरची कार जळगाव येथीलच शो रूम मध्ये दुरुस्तीसाठी जमा केली व गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या गाडीच्या स्पेअर पार्टच्या तुकड्यांच्या आधारे या कारचा व चालकाचा शोध लावून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे .
संपादन- भूषण श्रीखंडे