केळीच्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी; तब्बल सहा वर्षानंतर १८ वॅगन्स केळी दिल्लीकडे रवाना ! 

दिलीप वैद्य
Saturday, 16 January 2021

थंडीच्या काळात सुमारे ४ हजार क्विंटल केळी एकाच वेळी रेल्वेने दिल्लीला पाठविण्याच्या यशस्वी प्रयोगामुळे आगामी काळातही सातत्याने केळी रेल्वेने दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.

रावेर  : गेल्या सहा वर्षांत प्रथमच तालुक्यातून रेल्वेने सुमारे ४ हजार क्विंटल केळी दिल्ली येथे पाठविण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या किसान रेक योजनेअंतर्गत ही केळी पाठविण्यात आली असून, यापुढील काळात केळी रेल्वेने दिल्लीला पाठविण्याचे काम सातत्याने सुरू राहील, अशी स्थिती आहे.

आवश्य वाचा- रावेर येथे कोंबड्या दगावल्या; पशुपाल्यांमध्ये चिंतेचे वातावरण 
 

या आठवड्यातच सावदा रेल्वेस्थानकावरून व्हीपीयू प्रकारच्या ६ वॅगन्स भरून प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली येथे केळी वॅगन्स पाठविण्यात आल्या होत्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शनिवारी (ता. १६) १८ वॅगन्समधून प्रत्येकी २३ टन असा एकूण ४१४ टन म्हणजे सुमारे ४ हजार १०० क्विंटल केळी भरून रात्री उशिरा रवाना करण्यात आली. यात काही वॅगन्समध्ये कागदी बॉक्समध्ये केळी पॅकिंग करून पाठविण्यात आली तर काही वॅगन्समध्ये केळीचे सुटे घड भरण्यात आले. हा किसान रेक चोवीस तासातच दिल्लीला पोचविण्याची हमी रेल्वेने घेतली आहे, असे व्यापाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. ऐन थंडीच्या काळात सुमारे ४ हजार क्विंटल केळी एकाच वेळी रेल्वेने दिल्लीला पाठविण्याच्या यशस्वी प्रयोगामुळे आगामी काळातही सातत्याने केळी रेल्वेने दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी एका वॅगन्सला ३६ हजार १६० रुपये भाडे रेल्वेने आकारण्याचे केळी व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

 

रेल्वेने वॅगन्स उपलब्ध करून दिल्यास काही वॅगन्स रावेर रेल्वेस्थानकावरून भरण्याची तयारी येथील व्यापारी करीत आहेत. मध्यंतरी रावेर रेल्वेस्थानकातून एखाद दुसरी वॅगन भरून केळी दिल्ली येथे पाठविण्यात आली होती, पण एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर केळी दिल्ली येथील नया आझादपूर रेल्वेस्थानकावर पाठविण्याची गेल्या ६ वर्षातील ही पहिली वेळ आहे. 

आवर्जून वाचा- एकटा रडत बसलेला पाहून प्रवाशांना आली शंका; पोलीस आले आणि लावला शोध !
 

...अन् सुरू पुन्हा वाहतूक सुरू 
दिल्लीतील केळी व्यापाऱ्यांनी मागणी नोंदविल्याने ही केळी पाठविली जात आहे. सहा वर्षांपूर्वी दिल्लीतील व्यापाऱ्यांनी मागणी न करताच येथील शेतकरी व व्यापारी रेल्वेने केळी पाठवीत असत; तेथील रेल्वेस्थानकावर त्या केळीचा लिलाव होई. मात्र रेल्वेने केळी पाठविताना वाढलेला खर्च आणि रस्त्यावरून ट्रकने थेट दिल्लीतील गुदामात केळी पोचण्याची सोय झाल्याने मध्यंतरी रेल्वेने केळी वाहतूक बंद झाली होती. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banana farmer marathi news raver six years later bananas shipped train delhi