Latest Marathi News | रथमार्ग दुरुस्तीवरून रणकंदन; अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon : रथमार्ग दुरुस्तीवरून रणकंदन; अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

जळगाव : खानदेशचे वैभव असलेला जळगाव येथील श्रीराम रथोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यानिमित्ताने निघणारा वहनोत्सव दोन दिवसांत सुरू होणार आहे. मात्र या मार्गावरील खड्डे अद्यापही न बुजविण्यात आल्याने नगरसेवकांनी शुक्रवारी (ता. २१) संताप व्यक्त केला.
नगरसेवक सुनील खडके यांनी रथमार्ग दुरुस्तीबाबत प्रश्‍न उपस्थित केला. या वेळी बोलताना ते म्हणाले, की रथाचा मार्ग दुरुस्ती करण्याबाबत आपण आमदारांच्या बैठकीत प्रस्ताव दिला, तसेच यापूर्वीही कळविले आहे.

मात्र अद्यापही मार्गाची दुरुस्ती सुरू झालेली नाही. या वेळी नगरसेवक कैलास सोनवणे, सुनील महाजन, विशाल त्रिपाठी, विष्णू भंगाळे, अश्‍विन सोनवणे यांनीही रथमार्ग का सुरू झाली नाही, असा प्रश्‍न केला. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही मार्ग दुरुस्तीबाबत प्रशासन दिरंगाई करीत असल्याचा आरोप केला.(Battle over road repair Warning of action against officials Jalgaon News)

हेही वाचा: Diwali Festival : आजपासून दीपोत्सव प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी जळगावकर सज्ज!

महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की रथमार्ग दुरुस्तीबाबत आपण पंधरा दिवसांपूर्वी शहर अभियंत्यांना पत्र दिले; परंतु अद्यापही त्यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. अवघ्या दोन दिवसांवर उत्सव आला आहे. मार्ग कधी दुरुस्त करणार, असा प्रश्‍न नगरसेवकांनी उपस्थित केला.

त्याला उत्तर देताना शहर अभियंता एम. जी. गिरगावकर म्हणाले, की मक्तेदारांचा प्लांट बंद असल्याने तो येत्या दोन दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करेल त्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. दोन दिवसांवर वहनोत्सव आहे आणि मग दुरुस्ती कधी होणार? त्यानंतर नगरसेवकांनी इशारा दिला, की आज रात्रीतून रस्ता दुरुस्ती सुरू झाली नाही, तर आंदोलन करण्यात येईलच मात्र अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येईल.

यावर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी तातडीने काम सुरू होईल, अशी ग्वाही दिली, तर अभियंता सोनगिरे यांनीही मक्तेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देऊन काम करून घेण्यात येईल, असे सांगितले.

हेही वाचा: Jalgaon : वॉटरग्रेस म्हणते दिवाळी आली कचरा वाढला; नगरसेवक म्हणतात वॉटरग्रेसला हाकलाच!

शहर अभियंता गिरगावकरांवर कारवाई
महापालिकेचे शहर अभियंता एम. जी. गिरगावकर आदेश पाळत नसल्याचा आरोप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत पत्र शासनाला द्यावे, अशी मागणी श्री. सोनवणे यांनी केली, तर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी गिरगावकर मक्तेदारांकडून टक्केवारी घेतात, असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. महापौर जयश्री महाजन यांनीही गिरगावकर यांना आपण रथमार्ग दुरुस्तीबाबत पत्र देऊनही कार्यवाही केली नसल्याचा आरोप करीत आपण त्यांच्या कारवाईबाबत शासनाला पत्र देणार असल्याचे सांगितले.
महापालिकेची पत आणि संतप्त सुनील महाजन
रथमार्ग दुरुस्तीचा विषय सुरू होता. त्याची ताबडतोब दुरुस्ती झाली पाहिजे, असे मत नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत होते. त्याच वेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, की आपल्याकडे डांबर उपलब्ध आहे. ताबडतोब आपल्याकडे असलेल्या मशिनच्या माध्यमातून आपण दुरुस्ती सुरू करू, मात्र आपली मक्तेदाराकडे पत चांगली आहे, कोणत्याही मक्तेदारास सांगितले तर ते काम करून देण्यास नकार देणार नाहीत. यावर विरोधी पक्षनेते सुनील महाजन संतप्त झाले. ते म्हणाले, की आपल्या महापालिकेची मक्तेदाराकडे कोणतीही पत नाही, मक्तेदारांना एवढा त्रास दिला जातो की ते काम करण्यासही तयार होत नाहीत. त्यामुळे महापालिकेची पत सुधारण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे.

हेही वाचा: Diwali Festival : दिवाळीला आजपासून प्रारंभ