BHR Case : SIT कडून संशयितांच्या पुराव्यांचे संकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BHR Scam

BHR Case : SIT कडून संशयितांच्या पुराव्यांचे संकलन

जळगाव : बीएचआर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अपहार प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी एकेकाळी बीएचआरचे (BHR) सर्वेसर्वा प्रमोद ऊर्फ अंकल रायसोनी यांचे वकील म्हणूनही कामकाज केले आहे. (BHR Extortion Case Pune investigation information compiled with Forensic Auditor Jalgaon news)

फिर्यादीकडून एक कोटी २२ लाख खंडणी उकळल्याच्या आरोपप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयितांची माहिती व पुरावे संकलित करण्याचे काम तपास पथकाकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती केली होती.

तत्पूर्वी ॲड. चव्हाण उच्च न्यायालयात दाखल क्रिमिनल ॲप्लिकेशन (९८/२०११) मध्ये बीएचआर संस्थचे चेअरमन असलेले प्रमोद ऊर्फ अंकल रायसोनी यांच्या वतीने शासनाविरुद्ध खटला लढलेले आहेत. असे असताना ते विशेष सरकारी वकीलम्हणून बीएचआरच्या खटल्यात कामकाज पाहात होते.

ऑडिटर, तपासाधिकाऱ्यांच्या तक्रारी पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाणेमध्ये

फॉरेन्सिक ऑडिटर नेहा फडके आपल्या सांगण्याप्रमाणे काम करत नसल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिल्याचे श्रीमती फडके यांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती.

तर गुन्ह्याच्या तपासाधिकारी सुचेता खोकले यांनाही अरेरावीची भाषा करून न्यायालयात तारखेला वारंवार गैरहजर राहत असल्या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियंत्रणकक्ष यांच्याकडे लेखी तक्रार केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ॲड. चव्हाण यांची चौकशीही झाल्याचे प्राप्त दस्तऐवज अहवालावरून निदर्शनास येते.

बीएचआर प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी देखील ॲड. चव्हाण यांच्या वागणुकीबाबत लिहून ठेवल्याचे संपूर्ण दस्तऐवज आणि पुराव्यांचे संकलन करण्यात आले असून, तपासात त्याचा उपयोग होणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

जामिनाच्या निर्णयानंतर तपासाला गती

बीएचआरचे फॉरेन्सिक ऑडिटर शेखर सोनाळकर यांना वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मिळाला आहे. त्याचा कायम जामीन आणि ॲड. चव्हाण यांच्या अटकपूर्व जामिनावर न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात कामकाज सुरू आहे.

सरकारपक्ष, तपासाधिकाऱ्यांनी आपला ‘से’ सादर केल्यानंतर बचाव पक्षातर्फे झालेल्या प्रदीर्घ युक्तिवादाने जामीन अर्जावरील कामकाज सुरू झाले असून, सोमवारी (ता. १३) उर्वरित कामकाज होणार आहे.

दाखल तक्रारीत नमूद संशयितांच्या जामिनावर काय निर्णय होतो त्यानंतरच या गुन्ह्यातील तपासाला दिशा मिळणार असून, प्रचंड कागदपत्रे, पुरावे आणि गुंतागुंतीचा तपास असलेल्या या गुन्ह्यात एसआयटीचाही कस लागणार, हे मात्र निश्चित.