‘बर्ड फ्ल्यू’बाबत जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज; पोल्ट्री फार्मला  उपाययोजनांच्या दिल्या जाणार सूचना 

सचिन जोशी
Monday, 11 January 2021

जिल्ह्यातील कुठल्याही पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांची मर दिसून आल्यास त्वरीत पशुसंवर्धन विभागाला कळवावे.

जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेत. जिल्ह्यात २२६ पोल्ट्री फार्म असून त्यांना तातडीने उपाययोजनांबाबत सूचना देण्याचेही ते म्हणाले. 

आवश्य वाचा- गेलेले पैसे, दागीने परत मिळाले म्हणून आईच्या एका डोळ्यात आनंद; तर दुसऱ्या डोळ्यात मुलाचे दुःख !
 

परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ११) सायंकाळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, यांचेसह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते. 

या दिल्या सूचना 
पोल्ट्री व्यावसायिकांनी दक्षता म्हणून आपल्या पोल्ट्रीफार्मचे सॅनिटायझेशन करुन घ्यावे. जिल्ह्यातील कुठल्याही पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांची मर दिसून आल्यास त्वरीत पशुसंवर्धन विभागाला कळवावे. असे पक्षी कुठेही विक्री करु नये. शिवाय हे पक्षी इतर पक्षांमध्ये मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी. नगरपालिका क्षेत्रात जेथे मोठे मार्केट आहे तेथील विक्री होणारे मांस नगरपालिकेच्या पथकाने तपासावे. जिल्ह्यात अंदाजे २२६ पोल्ट्री फार्म आहेत. या व्यावसायिकांशी पशुसंवर्धन विभागाने समन्वय साधून त्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bird flu marathi news jalgaon poultry farm instructions collector