Latest Marathi News | जळगाव : जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांनी केला पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest

जळगाव : जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांनी केला पर्दाफाश

चाळीसगाव : तालुक्यातील विविध गावांमधून जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून रोकडसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, चौकशीतून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

ममराज भाईदास जाधव (वय ३०, रा. सोनगाव, ता. चाळीसगाव) या शेतकऱ्याची सोनगाव शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमधून १ लाख ६० हजार रुपये किमतीचे जनावरे अज्ञाताने चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. १३) घडली होती. याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस कर्मचारी नितीन सोनवणे हे करीत होते. दरम्यान, जनावरांच्या चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पथकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार चोरी करणारी टोळी ही सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथील असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना शुक्रवारी मिळाली.

त्यावर पोलिस कर्मचारी नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, संदीप पाटील यांच्या पथकाने सिल्लोड गाठून शेख इम्रान शेख ईसा (वय ३०), शेख इब्राहीम उर्फ मौल्या शेख उस्मान (वय २६), शेख उमेर शेख ताहीर (वय २७), सर्फराज बिलाल खाटीक (वय २२), शेख सत्तार शेख ईसा (वय २४), शेख इरफान शेख ईसा (वय ३३) (सर्व रा. आबदलशानगर, इदगाह, सिल्लोड, जि.औरगाबांद) या संशयितांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीत ठेवण्यात येऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी सहा गुन्ह्याची कबुली दिली. त्यात खेकडे येथून ६ जनावरे, वाघळी शिवारातून ४, न्हावेतून ३, जावळे शिवारातून २, रोकडे फाटा येथून २ व पिंपळवाडी येथून ३ अशी एकूण २० जनावरे चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर संशयितांकडून ८ हजार रुपये रोख व ५ लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे.

त्यांची अधिक कसून चौकशी सुरू असून तालुक्यातील नागद, पिलखोड, हनुमंतखेडा व परिसरातील चोरी केल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी चोरी केलेल्या जनावरांची विल्हेवाट सिल्लोड व मालेगाव येथे लावत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार, सहाय्यक फौजदार राजेद्र सांळुखे, सहाय्यक फौजदार अविनाश पाटील, पोलिस कर्मचारी युवराज नाईक, नितीन सोनवणे, दत्तात्रय महाजन, कैलास पाटील, दीपक ठाकूर, नितीन आमोदकर, शांताराम पवार, गोवर्धन बोरसे, संदीप पाटील, भुपेश वंजारी, संदीप माने, ज्ञानेश्वर बडगुजर, देविदास पाटील, दिनेश पाटील, प्रेमसिंग राठोड, विजय पाटील, संदीप पाटील, हिराजी देशमुख, नंदकुमार जगताप, मालती बच्छाव, अनिल आगोणे, मनोहर पाटील आदींनी केली आहे.

पोलिसांच्या वाहनाला अपघात

दरम्यान, पोलिसांचे पथक तपासासाठी सिल्लोड येथे जात असताना वाहनाचा (एमएच १९, सीझेड २२१२) अपघात घडला. वाहन अचानक पुलाखाली कोसळल्याने झालेल्या अपघातात पोलिस कर्मचारी गोवर्धन बोरसे यांचा हात फ्रॅक्चर होऊन मुका मार लागला. उर्वरित कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली.

टॅग्स :JalgaonpoliceArrestCattle