
Jalgaon Rain Update : करंजीत ढगफुटी; कुटुंबे रस्त्यावर
पारोळा (जि. जळगाव) : तालुक्यातील करंजी बुद्रुक येथे मध्यरात्री बारा ते दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. यात आदिवासी भिल्ल परिसरात ढगफुटी झाल्यामुळे काही गरीब कुटुंबे रस्त्यावर आली.
या परिसरात सुमारे ४० घरांचे नुकसान झाले असून, काही शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत तर पशुधनालाही हानी पोचली आहे. (Cloudburst in Karanji Families on Street Jalgaon Rain Update latest marathi news)
गेल्या आठ, दहा दिवसांपासून खंड पडलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. ५) मध्यरात्रीच्या सुमारास शहरासह तालुक्यात जोरदार हजेरी लावली. या वेळी करंजी बुद्रुक येथे ढगफुटीसदृश पाऊस झाल्यान घरातील मातीच्या भिंती कोसळल्या.
यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य, कपडे मातीमोल झाले. निसर्गाचा प्रकोप इतका भयानक होता, की यात गरीब वस्तीतील कोंबड्या जमिनीत दाबल्या गेल्या तर शेळ्यांना झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
या घटनेची माहिती कळताच तहसीलदार अनिल गवांदे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी करत गरीब वस्तीतील लोकांना दिलासा दिला. या वेळी सरपंच भय्यासाहेब रोकडे, तलाठी प्रशांत निकम, ग्रामसेविका वैशाली पाटील, पोलिस पाटील कल्पना पाटील, ग्रामपंचायत सदस्य हे परिसरातील पंचनामाकामी सहकार्य करीत आहे.
या नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे पाठवले असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गरीब वस्तीतील कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य करीत आहेत. ढगफुटीमुळे ४० घरांचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा: MVP Election : इच्छुकांसाठी निवडणूक नियमावली जारी; इच्छुकांकडून अनेक अर्ज
पंचनाम्याच्या सूचना
या वेळी गटविकास अधिकारी विजयकुमार लोंढे यांच्यासह विस्ताराधिकारी आर. डी. इंगळे यांनी करंजी गावी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी सरपंच भय्यासाहेब रोकडे यांनी शासनाकडे केली आहे.
या वेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदार अनिल गवांदे यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, गरीब कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
निसर्गाचा प्रकोप भयावह
ढगफुटीमुळे आदिवासी भिल्ल वस्तीतील घरे जमीनदोस्त झाली तर करंजी शिवारातील शेतकऱ्यांची पिके या पावसामुळे पाण्याखाली आली.
निसर्गाचा हा प्रकोप करंजी गावासाठी भयावह ठरला आहे. गेल्या अनेक दिवसापासून पावसाअभावी पिके कोमेजू लागली होती. मात्र आता ढगफुटीच्या पाण्यामुळे पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
हेही वाचा: पौरोहित्यातही महिलाराज : स्त्री पौरोहित्याची पध्दत वैदिक काळापासून
Web Title: Cloudburst In Karanji Families On Street Jalgaon Rain Update Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..