esakal | चाळीसगावात कोरोना एक्सप्रेस सुसाट; चार हजारांवर रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

चाळीसगावात कोरोना एक्सप्रेस सुसाट; चार हजारांवर रुग्ण 

कोरोनाचा प्रकोप संपला असे वाटत असताना फेब्रुवारीच्या १५ तारखेनंतर पुन्हा कोरोनाची एक्सप्रेस सुसाट धावू लागली आहे.

चाळीसगावात कोरोना एक्सप्रेस सुसाट; चार हजारांवर रुग्ण 

sakal_logo
By
आनंन शिंपी

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः चाळीसगाव तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाची एक्सप्रेस सुसाट धावू लागली आहे. आठवड्यापासून दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असतानाही बिनधास्तपणे रस्त्यांवर गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनीच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, साबणाने हात धुणे यासारख्या उपाययोजनांची प्रकर्षाने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 

आवर्जून वाचा- जामनेरमध्ये कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर ‘गुलाबी गँग’महिला पथकाची धडक मोहीम 


चाळीसगाव शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही असेच चित्र दिसून येत आहे. बहुतांश खेड्यांमध्ये तर नेहमी असते तशीच गर्दी आठवडे बाजार, गावातील मुख्य चौक व रस्त्यांवर होत आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास बऱ्याच ग्रामपंचायती अपयशी ठरल्या आहेत. सुमारे वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मागीलवर्षी २२ मार्चलाच लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून जनजीवन जे विस्कळीत झाले, ते आजही काही प्रमाणात विस्कळितच आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून बरेच जण बेरोजगार झाले आहेत. अशातच कोरोनाचा प्रभाव काहीसा ओसरत असताना जनजीवन पूर्वीसारखेच होईल असे चित्र दिसत होते. मात्र, अशातच पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढले. आतापर्यंत दिवसाला एखादा दुसरा रूग्ण आढळून येत होता. बऱ्याचदा तर एकही रुग्ण आढळून येत नव्हता. त्यामुळे कोरोनाचा प्रकोप संपला असे वाटत असताना फेब्रुवारीच्या १५ तारखेनंतर पुन्हा कोरोनाची एक्सप्रेस सुसाट धावू लागली आहे. आता हा वेग इतका वाढतो आहे, की पूर्वीसारखीच परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 


आवश्य वाचा- खानदेशच्या सुपुत्राचा गुजरात मध्ये डंका ! दुसऱ्यांदा नगरसेवक पदी विजयी
 

चार हजारांवर रुग्ण 
चाळीसगाव तालुक्यात कोरोना रूग्णवाढीचा वेग वाढता आहे. जिल्ह्यात जळगाव शहरानंतर चाळीसगावात कोरोनाचे अधिक रुग्ण असल्याने चाळीसगाव पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात कोरोनाचे ४ हजार ११६ रूग्ण आहेत. त्यापैकी ३ हजार ८१३ रूग्ण बरे झाले असून २२४ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत तालुक्यात तब्बल ७९ जणांचा बळी गेला आहे. असे असतानाही नागरिकांमधील बेफिकरी चिंता निर्माण करणारी आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे