कोरोनाचा चाचण्या कमी झाल्या; मात्र रुग्ण संख्या वाढली

सचिन जोशी
Thursday, 31 December 2020

दिवसभरात जळगाव शहरातील ६९ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बळींचा आकडा १३२९ झाला असून मृत्यूदर २.३८ टक्क्यांवर कायम आहे.

जळगाव : जिल्ह्यात साडेतीन महिन्यांपासून काही प्रमाणात नियंत्रणात असलेला कोरोनाचा संसर्ग वर्षाखेरीस पुन्हा डोके वर काढण्याची भीती निर्माण झाली आहे. गुरुवारी कमी चाचण्यांचे अहवाल प्राप्त होऊनही नव्या बाधितांची संख्या ६० होती, तर दिवसभरात ४४ रुग्ण बरे झाले. 

जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. बुधवारी नव्या रुग्णांचा आकडा ८०वर पोचला होता. तर गुरुवारीही अवघ्या अकराशे चाचण्यांमधून ६० रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५५ हजार ८५५ झाली आहे, बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ७८ वर पोचला आहे. 
दिवसभरात जळगाव शहरातील ६९ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बळींचा आकडा १३२९ झाला असून मृत्यूदर २.३८ टक्क्यांवर कायम आहे. 

चोपड्यात वाढला संसर्ग 
दोन-तीन दिवसांपासून चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यात संसर्ग वाढतोय. गुरुवारीही चोपडा तालुक्यात १७, मुक्ताईनगरात ८ रुग्ण तर जळगाव शहरात १० बाधित आढळून आले. भुसावळ ८, जामनेर ४, अमळनेर ३ नवे रुग्ण सापडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona marathi news jalgaon patients increase