जिल्हा रुग्णालयात कोविड लशीकरणाची तयारी पूर्ण; अधिकाऱ्यांनी केली पाहणी 

देविदास वाणी
Friday, 15 January 2021

लसीकरणाच्या ठिकाणी जागा मोकळी असल्याने तेथे नावनोंदणी, लसीकरण, निरीक्षण अशा त्रिस्तरीय रचनेतून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपणार आहे

जळगाव ः : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जळगावात दाखल झालेल्या 'कोविशील्ड' या लशीचे डोस जिल्ह्यात ७ केंद्रावर दिले जाणार आहे. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडी इमारतीत तिसऱ्या मजल्यावर वैद्यकीय अधीक्षकांच्या क्रमांक ३०० या कक्षात त्याची तयारी पूर्ण झाली आहे. 

आवर्जून वाचा- दुर्मिळ आजार बालिकेला जडला; डॅाक्टरांनी असे केले, की 'ती' स्वतःच्या पायावर घरी चालत गेली !
 

लसीकरणाच्या ठिकाणी जागा मोकळी असल्याने तेथे नावनोंदणी, लसीकरण, निरीक्षण अशा त्रिस्तरीय रचनेतून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपणार आहे. प्रत्येकी ५ एमएलची लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या पूर्वसंध्येला आज वैद्यकीय कक्षातील जागेची स्वच्छता, कर्मचाऱ्यांची नेमणूक व पाहणी ह्या बाबी जिल्हा रुग्णालय व शासकीय रुग्णालयात पूर्ण झाल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रशासकीय अधिकारी डॉ.उत्तम तासखेडकर, आरएमओ डॉ. विलास जयकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, डॉ.विजय गायकवाड यांनी पाहणी करून कर्मचाऱ्यांकडून नियोजन जाणून घेतले. 

वाचा- व्हाट्सएपने जोडले अठराशे विवाह; सोशल मिडीया ठरतेय मध्यस्‍थी
 

लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते ५ असून दिवसभरात १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना हि लस दिली जाणार आहे. शासकीय रुग्णालयात विविध व्याधींवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी ९ ते १ हि वेळ ओपीडीची असते. रुग्णांना उपचार घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सोयीचे व्हावे म्हणून सकाळीच गर्दी करू नये, टप्प्याटप्प्याने लसीकरणासाठी यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine marathi news jalgaon corona vaccination preparations complete