
Cotton Rate News : यंदा कापसात केवळ 12 लाख गाठींचे उत्पादन; शेतकऱ्यांसह जिनर्सला गत हंगाम तोट्याचाच
Jalgaon News : गेल्या खरीप हंगामात (२०२२) कापसापासून बारा लाख गाठींची निर्मिती यंदा झाली आहे. गतवर्षीपेक्षा तीन लाख गाठींची अधिक निर्मिती झाली आहे.
गतवर्षी केवळ ९ लाख गाठींची निर्मिती झाली होती. नवीन खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू झाल्याने आता जिनिंग, प्रेसिंगमध्येही लवकरच कापसावर प्रक्रिया करणे थांबून यंदाचा हंगाम संपेल, असे चित्र आहे.
कापसाच्या दरात आज २०० ते ३०० रूपयांची वाढ हेावून कापसाला ७ हजार १०० ते ७ हजार २०० रूपयांपर्यंत दर मिळत आहे. (cotton this year Production of only twelve lakh bales Price hike Farmers ginners suffered losses last season Jalgaon News)
कापसापासून दरवर्षीचे १८ ते २५ लाख गाठी तयार होतात. गतवर्षी (२०२१) कापूस टंचाईने केवळ नऊ लाख गाठींची निर्मिती झाली होती.
यंदा (२०२२) मध्ये कापूस उपलब्ध असूनही दहा ते तेरा हजारांचा दर कापसाला मिळाला नाही. यामुळे सिझनमध्ये कापसाची आवक बाजारपेठेत न झाल्याने जिनर्सला २५ लाख गाठींचे उत्पादन करता आले नाही.
आतापर्यंत केवळ १२ लाख गाठींची निर्मिती झाली. जून अखेरपर्यंत जिनिंग सुरू राहतील, त्यात आणखी दोन लाख गाठींची निर्मिती शक्य आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एकशे दहा जिनिंगपैकी सध्या फक्त २५ ते ३० जिनिंग सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नव्हती.
परिणामी कापसाला दरही नाहीत. २७ मेस कापसाला ६ हजार ८००चा निच्चांकी दर मिळाला. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढू लागली असून, खंडीचा दर ५८ हजारांवरून ६० हजारांपर्यंत गेला आहे.
परिणामी, कपाशीच्या दरात दोनशे ते तिनशे रूपयांची वाढ झाली. सध्या ७१०० ते ७२०० चा दर कापसाला मिळत आहे. यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला प्रतिक्विंटल दहा ते १३ हजारांचा दर कापसाला मिळालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ५५ टक्के कापूस अद्यापही शेतकऱ्यांकडे पडून आहे.
* दरवर्षी होणारे कापसाच्या गाठींचे उत्पादन : १८ ते २५ लाख
* गतवर्षी उत्पादित गाठी : ९ लाख
* यंदा आतापर्यंत झालेले उत्पादन : १२ लाख गाठी
* खंडीला सध्या मिळत असलेला भाव : ६० हजार रूपये
* शेतकऱ्यांना गतवर्षी प्रतिक्विंटल मिळालेला दर : ९ ते १३ हजार
* यंदाचा सध्याचा कापसाचा दर : ७१०० ते ७२००
"यंदाचा कापूस हंगाम शेतकरी, जिनिंग-प्रेसिंग यांच्यासाठी चांगला गेला नाही. दहा ते तीस टक्के तोटा झाला आहे. म्हणावा तसा नफा झाला नाही. कापसाला जेव्हा चांगला दर होता (८ ते ८५००) तेव्हा शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. कापसाचे दर आंतराष्ट्रीय स्तरावरील मागणीवर अवलंबून असतात. कापूस बाजारात न आल्याने जिनर्सचेही मोठे नुकसान झाले आहे."
-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग, प्रेसिंग असोसिएशन