पती-पत्नी मृत्येूचे गुढ कायम; विष घेतले की दिले, अद्यापही अस्पष्ट  

रईस शेख
Monday, 4 January 2021

प्रेमविवाह करून ३१ डिसेंबरला दोघेही जोड्याने गावात परतले होते. पोलिसांनी दोघांच्या पालकांना कायदेशीर बाबी समजून सांगत समज दिली.

जळगाव ः प्रेमविवाहनंतर पाळधी येथे परतलेल्या पती-पत्नीचा अवघ्या तीन दिवसांत विष प्राशनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्या‍यात खळबळ माजली होती. दोघांनी नेमके विष का घेतले किंवा हा घातपात आहे का, याचा उलगडा झालेला नसून मृत्यूनंतर दोघांचा व्हिसेरा प्रयोगशाळेत तपासणीला रवाना करण्यात आला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच तपासाला दिशा मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

एकाच गावातील प्रशांत व आरती यांनी प्रेमविवाह करून ३१ डिसेंबरला दोघेही जोड्याने गावात परतले होते. पोलिसांनी दोघांच्या पालकांना कायदेशीर बाबी समजून सांगत समज दिली होती. घटनेच्या आदल्या दिवशी गुरुवारी (ता. ३१) रात्री नवदांपत्या सोबत असे काय घडले, की त्यांचे जगणेच कठीण होऊन बसले. शासकीय प्रयोगशाळेत व्हिसेराची तपासणी झाल्यावर दोघांनी कोणते विष घेतले होते, अन्न पदार्थातून विष देण्यात आले की कसे, आदी अनुत्तरीत प्रश्‍नांची उकल होणार आहे. 

कुटुंबीय जेलमध्ये 
आरतीचे वडील विजय हरसिंग भोसले यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात प्रशांत व त्याचे वडील विजयसिंग पाटिल, मित्र विकास धर्मा कोळी, विक्की कोळी अशांना ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. प्रशांतच्या मृत्यूनंतर बहीण कविता पाटिल यांच्या तक्रारीवरून विजय हरसिंग भोसले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली. मुलीच्या वडिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

 

दोघांच्या मृतदेहाचा व्हिसेरा प्रीझर्व करून तो शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जाईल. व्हिसेरा अहवालात दोघांच्या पोटात नेमके कोणते विष होते, याचा उलगडा होऊन बऱ्याच प्रश्‍नांची उकल होणार आहे. 
-हनुमंत गायकवाड, 
सहाय्यक निरीक्षक, धरणगाव  

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news jalgaon couple death cause mystery