
सत्तेच्या सारीपाटात आम्हाला मदत मिळणार तरी कशी?; शेतकऱ्यांची आर्त हाक
बोदवड (जि. जळगाव) : तालुक्यातील जुनोने व शेवगे येथे शुक्रवारी (ता. २४) आलेल्या वादळी पावसामुळे (Stormy Rainfall) केळी बागांसह घराची पडझड होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रावेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या महिनाभरात अनेक अस्मानी संकटे केळी उत्पादकांवर आली. (crop damage in junone shevti due to heavy rainfall storm Jalgaon News)
शेतकऱ्यांची अवस्था जीवन मरणाची झालेली असताना दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे आसाम येथील गुवाहाटीमध्ये मजेशिर राजकारणाचा सारीपाट आखत आहेत, तर त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील सुद्धा तेथे तळ ठोकून आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपला प्रतिनिधी पाहणी करण्यासाठी पाठवला खरा, पण याचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार, याचे उत्तर कुणाकडेच नाही. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर व आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून बोदवड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आनंदा पाटील आले होते. या वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडत मदतीचे आवाहन केले.
हातातोंडाशी आलेले केळीचे पीक वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाले तर तालुक्यातील शेवगे येथे झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे ,जनावरांच्या गोठ्यांसह शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांच्या बांधावर जाऊन जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे- खेवलकर व बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील यानी कार्यकर्त्यांसह पाहणी केली. शेवगे येथे राजाराम सुलताने यांच्या गोठ्याची, शेवगे शिवारातील शेतीची व पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी केली तर जुनोने येथे कुंडलिक पाटील, सुनील पाटील, कैलास पाटील, मधुकर पाटील, भीमराव पाटील, मधुकर पाटील या शेतकऱ्यांच्या शेतात केळीचे मोठे नुकसान झाले असून, इतर काही शेतकऱ्यांच्या शेतात देखील काही प्रमाणात झाले आहे.
दरम्यान, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी, असे आदेश आमदार खडसे व आमदार पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदार संचेती यांना दिल्याचे सांगण्यात आले. राज्यात वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, मात्र शेतकऱ्यांना तत्काळ मदत कशी केली जाईल, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा: भुसावळ विभागात ‘फुकट्या’ रेल्वे प्रवाशांवर कारवाई
नुकसानीची पाहणी करताना रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, भरत पाटील, मधुकर राणे, रामदास पाटील, भागवत टिकारे, प्रदीप बडगुजर, नाईक खान, किशोर गायकवाड तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठविलेले प्रतिनिधी नगराध्यक्ष आनंदा पाटील, हाजी सईद बागवान, दिनेश माळी, नीलेश माळील हर्षल बडगुजर, जितेंद्र पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा: जलसिंचन पाणी योजनेच्या वीज मोटार चोरीचा प्रयत्न; चोरटे जेरबंद
Web Title: Crop Damage In Junone Shevti Due To Heavy Rainfall Storm Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..