जळगाव तर राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Demonstrate non political agitation

..तर राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आंदोलन

पाचोरा : पाचोरा - जामनेर (पीजे) ही ब्रिटिशकालीन ठेवा असलेली रेल्वे बंद होणे हा खासदार म्हणून माझा सर्वांत मोठा अवमान ठरणार असून, ही रेल्वे बंद करण्याबाबत कोणतेही आदेश निघालेले नसून उलट तिच्या विस्तारीकरणाबाबत अधिवेशनात निधीसह मंजुरी मिळाली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये याबाबतची निविदा प्रसिद्ध होईल. त्यामुळे इतर रेल्वे मार्गाप्रमाणे पीजे रेल्वे सध्या बंद आहे. त्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे, असे आश्वासनात्मक प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी पाचोरा येथे आयोजित बैठकीत केले.

हेही वाचा: या एका मुद्द्यावर राष्ट्रपती राजवट लागू शकते - चंद्रकांत पाटील

पीजे बंद होण्याबाबत हालचाली झाल्या तर मी राजकारणाचे जोडे व खासदारकी बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून पीजे रेल्वे बंद संदर्भात चर्चा प्रतिचर्चा सुरू असल्याने पीजे बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीने आठवडाभरात पाचोरा, जामनेर, पहूर, शेंदुर्णी, वरखेडी या रेल्वेस्थानकांवर बैठका घेऊन याबाबत जनजागृती केली. समितीने खासदार, आमदार व रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदने देऊन रेल्वे बंद झाल्यास दिल्लीपर्यंत धडकून आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमोल शिंदे यांनी पाचोरा येथील पीजे रेल्वेस्थानक परिसरात बैठक घेतली. खासदार उन्मेष पाटील अध्यक्षस्थानी होते.

हेही वाचा: राज्यपाल फारच अभ्यासू, इतका अभ्यास बरा नव्हे : राऊत

या बैठकीत पीजे बचाव कृती समितीच्या वतीने खलील देशमुख, सुनील शिंदे, ॲड. अण्णा भोईटे यांनी मते मांडली. आमदार किशोर पाटील यांनी पीजे रेल्वे बंद करण्यात आल्यास शिवसेना स्टाइल आंदोलनाचा दिलेला इशारा स्पष्ट करून खासदारांनी या विषयात लक्ष घालावे. राज्य सरकारकडून ज्या काही अडचणी व समस्या उपस्थित होतील, त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगून पीजे रेल्वे बंद होणार नाही. याबाबत डीआरएम यांचे लेखी पत्र तरी खासदारांनी मिळवून द्यावे, असे स्पष्ट केले. पीजे बचाव कृती समिती सदस्यांसह प्रवासी, अपडाऊन करणारे कर्मचारी, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी, रिक्षा युनियनचे पदाधिकारी आदींनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या. विविधांगी प्रश्न उपस्थित केले व ही रेल्वे सुरू करण्याबाबत मागणी केली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू

खासदार उन्मेश पाटील यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले, की खासदार वाय. जी. महाजन यांच्यापासून या रेल्वेच्या विस्तारीकरणासंदर्भात हालचाली सुरू आहेत. खासदार रक्षा खडसे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही त्यासंदर्भात प्रयत्न केले असून, आताही प्रयत्न थांबलेले नाहीत. या अधिवेशनात नॅरोगेज पीजे रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून हा रेल्वे मार्ग बोदवडपर्यंत नेण्याच्या कामास अधिवेशनात मंजुरी मिळाली असून, ८२७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये याबाबतची निविदा निघेल. त्यामुळे ही रेल्वे बंद होण्याबाबतचा कोणताही आदेश नाही. बैठकीत पीजे लवकर सुरू करावी, यासह बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. खलील देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ॲड. अविनाश भालेराव यांनी सूत्रसंचलन केले. सुनील शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Demonstrate Non Political Agitation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonpolitical