Latest Marathi News | न्यायालयातून गुन्हा दाखलसाठी न्याय मिळविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District Milk Union Case

District Milk Union Case : न्यायालयातून गुन्हा दाखलसाठी न्याय मिळविणार

जळगाव : जिल्हा दूध संघात वस्तूची चोरी झाली आहे. त्यामुळे त्याचा लगेच गुन्हा दाखल करून घ्यायला हवा आहे आणि त्याची चौकशी करायला हवी मात्र गुन्हाच दाखल नाही, तर चौकशी करणार तरी कशी? पोलिस कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहेत.

एकनाथ खडसे यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी योग्य आहे, मात्र आता या प्रकरणी न्यायालयातून आम्ही न्याय मिळविणार आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यानंतर खडसे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

जिल्हा दूध संघात सव्वा कोटीच्या लोणी व दूध भुकटी अपहारप्रकरणी अध्यक्षा मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी खडसे यांनी शहर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.(District Milk Union Theft Case Khadse withdrew Thiyaa Agitation Jalgaon News)

हेही वाचा: BJP Agitation : तूप लोणीचोरी तरीही उलट्या बोंबा!

गुरुवारी (ता.१३) रात्रभर त्यांनी शहर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, तसेच कार्यकर्त्यांनी रात्रभर ठिय्या दिला. गुन्हा दाखल झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

जयंत पाटील यांची आंदोलनस्थळी भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव दौऱ्यावर आहेत. मुंबईहून रेल्वेने जळगाव येथे दाखल होताच त्यांनी सकाळी नऊला शहर पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा केली.

...तर न्यायालयात जाऊ : पाटील

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की जिल्हा दूध संघात झालेल्या चोरी प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे, त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. मात्र पोलिसांवर कोणाचा तरी दबाव असून, त्यामुळे ते गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे दिसत आहे. मात्र या प्रकरणी आम्हाला न्यायालयात जाण्याचा मार्ग असून, न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्याबाबत न्याय मिळविणार आहोत. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याच प्रकरणी दिलेल्या तक्रार अर्जाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना पाटील म्हणाले, की त्यांनी अपहाराची तक्रार केली आहे. त्यामुळे त्याची चौकशी करून गुन्हा दाखल होईल, या ठिकाणी मात्र वस्तू चोरी झाली आहे. त्याचा गुन्हा दाखल करणे आवश्‍यक आहे.

याचिका दाखल करणार : खडसे

गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार खडसे यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन जयंत पाटील यांच्या आवाहनानुसार मागे घेतले. याबाबत बोलताना श्री. खडसे म्हणाले, की पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी दोन दिवसांत अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्या माध्यमातून याचिका दाखल करून गुन्हा दाखल करण्यासाठी न्याय मिळविणार आहोत. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत आहोत.

हेही वाचा: Jalgaon : शहरात वाहतूक सिग्नल बंद वाहतुकीची कोंडी

टॅग्स :JalgaoncrimeCourt