
Jalgaon Crime News : भरचौकात ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला लुटले; भामटे भुसावळच्या दिशेने फरार
जळगाव : दुकानातील दिवसभर विक्री झालेले पैसे घेऊन घराकडे निघालेले ड्रायफ्रूट व्यापारी ईश्वर मेघाणी (रा. सिंधी कॉलनी) यांची आठ लाखांची रोकड असलेली बॅग ट्रिपलसीट आलेल्या भामट्यांनी राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोर हिसकावून फरारी झाले. (dry fruit merchant robbed Eight lakhs in the bag thieves run jalgaon crime news)
सिंधी कॉलनीतील ईश्वर मेघाणी यांचे दाणाबाजारात दुकान आहे. बँकेत भरणा करण्यासाठी सोमवारी (ता. २३) त्यांनी आठ लाखांची रक्कम बॅगेत ठेवली होती. मात्र, बँकेत भरणा न करता आल्याने ती रक्कम घेऊन दुकान बंद केल्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीने घराकडे निघाले.
राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळील गणेशवाडीकडे वळण घेताना, अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या दोघांनी मेघाणी यांच्या दुचाकीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून दुचाकीवरून पोबारा केला.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित यांच्यासह जिल्हापेठ, एमआयडीसी आणि एलसीबीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मेघाणी यांनी घडलेला संपूर्ण प्रकार कथन केल्याप्रमाणे रेकॉर्डवरील रस्ता लुटीच्या गुन्ह्यारांचा शोध सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजची धुंडाळणी पोलिस करीत आहेत.
आठ लाखांचा पाठलाग
मेघाणी यांची बॅग हिसकावल्यावर मेघाणी यांनी आरडाओरड केल्यावर त्यांच्या मागून आलेले अमर कारडा यांच्यासह त्यांनी त्या चोरट्याचा पिच्छा पुरविला. मात्र, सुसाट वेगात भामटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. चोरट्यांनी पळवून नेलेल्या बॅगेत मेघाणी यांचा लॅपटॉपसह मोबाईल होता. त्याच्याद्वारे
संशयितांचा तांत्रिक शोध सुरू असताना, राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावापर्यंत मोबाईल सुरू होता. मात्र, भामट्यांनी वारंवार बेल वाजत असल्याने बंद केला असावा.