esakal | जेडीसीसी बँक निवडणूक; महिनाभरात प्रारूप मतदारयादी जाहीर होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

जेडीसीसी बँक निवडणूक; महिनाभरात प्रारूप मतदारयादी जाहीर होणार 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलली आहेत.

जेडीसीसी बँक निवडणूक; महिनाभरात प्रारूप मतदारयादी जाहीर होणार 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) निवडणूक प्रक्रियेला प्रशासकीय पातळीवर आता वेग येत आहे. महिनाभरात जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीयप्रमाणे राजकीय पातळीवरदेखील चाचपणी केली जात आहे. 

आवश्य वाचा- लग्नाची वरात आणि ‌ १६ लाख चोरट्यांच्या खिशात ! 
 

कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता सहकार विभागाच्या प्राधिकरणाने टप्प्याटप्प्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकांचीही प्रक्रिया सहकार विभागातर्फे सुरू आहे. कोरोनाआधी जिल्हा बँक निवडणुकीसाठी ठराव मागविण्यात आले होते. हे ठराव कायम ठेवण्यात आले असून, उर्वरित सहकारी संस्थांकडूनही ठराव मागविण्यात आले आहेत. हे ठराव प्राप्त झाल्यानंतर ते पुन्हा विभागीय सहनिबंधकांकडे पाठविण्यात येणार आहेत. 

जिल्हा बँकेत खडसेंचे वर्चस्व 
सध्या जिल्हा बँकेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर विद्यमान अध्यक्षा आहेत. २०१४ मध्ये जिल्हा बँक निवडणुकीसाठी खडसे यांनी सर्वपक्षीय पॅनल तयार केले होते. यंदा मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही जिल्हा बँक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. जिल्हा बँकेत भाजपचे ११, राष्ट्रवादी पाच, शिवसेना चार आणि काँग्रेसचे एक असे एकूण २१ संचालक आहेत. आता खडसेच राष्ट्रवादीत आल्याने जिल्हा बँकेत राजकीय समीकरण कसे बदलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

आवर्जून वाचा- जळगावात कोरोना रुग्ण वाढतयं; लग्नसमारंभ, बाजार, गर्दीच्या ठिकाणांवर पून्हा मनपाची नजर 
 

प्रशासकीय पातळीवर प्रक्रियेला वेग 
जिल्हा बँक निवडणुकीसाठी आतापर्यंत ५३३ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे ठराव आले. इतरांचे ७८१ ठराव असे एकूण एक हजार ३१४ ठराव जिल्हा सहकार विभागाकडे प्राप्त झाले आहेत. उर्वरित संस्थांचेही ठराव मागविण्यात आले असून, महिनाभरात जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. जिल्हा बँक निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. जिल्ह्यातील राजकारण याच निवडणुकीभोवती फिरते राहिले आहे. त्यामुळे ही सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी आता भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा सामना बघायला मिळणार आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image