ना रीडिंग वेळेत, ना वीजबिल वेळेवर; महावितरणचा मनमौजी कारभार 

ना रीडिंग वेळेत, ना वीजबिल वेळेवर; महावितरणचा मनमौजी कारभार 

जळगाव : वीजदरवाढीसह अवाजवी बिलांचा ‘शॉक’ देणाऱ्या महावितरणकडून ग्राहकांची बिलांच्या वितरणावरूनही पिळवणूक होत आहे. नियमितपणे रीडिंग घेतले जात नसताना बिलेही वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांना आर्थिक दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या संदर्भात शहरातील अनेक भागांतून तक्रारी येत असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारींना बासनात घालत मनमौजी कारभार सुरू ठेवला आहे. 

आवश्य वाचा- कोरोनाने उतरवली ‘चिल्ड बिअर’ची नशा !

कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाउन लागल्यानंतर अनेकांचा रोजगार गेला. आर्थिक घडी विस्कटलेली असताना, महावितरणने त्याचा गैरफायदा घेत अवाजवी बिले पाठवून ग्राहकांची पिळवणूक सुरू केली. एप्रिल २०२० पासून वीजदरवाढीचा शॉक ग्राहकांना दिला. शिवाय स्थिर आकार, वहन आकार, वीजशुल्क अशा जाचक करांद्वारे ग्राहकांची लूट सुरूच ठेवली आहे. आतातर थकबाकीदार ग्राहकांचे कनेक्शन कट करण्याच्या दृष्टीने त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. 

बिलांमधील गोंधळ सुरूच 
एकीकडे विविध कर, वाढीव वीजदरामुळे ग्राहक त्रस्त असताना, बऱ्याच ठिकाणी रीडिंग न घेताच वर्षभरातील वीजवापराची सरासरी काढत सर्रास काहीही युनिट दर्शवून बिले दिली जात आहेत. जळगाव शहरातील काही भागांत बिले वेळेवर येत नसल्याने तत्पर भरणा सुविधेपासून ग्राहक वंचित राहत आहेत. काही ग्राहकांनी तर बिल भरण्याच्या तारखेला अथवा एक दिवस आधी बिले प्राप्त होत असल्याचे म्हटले आहे. 

अधिकाऱ्यांकडून उडवाउडवी 
वाढीव वीजबिलांबाबत तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना महावितरण अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. काहीही ऐकून घ्यायचे नाही आणि पाठविलेले वीजबिल योग्य कसे आहे, हे पटवून देण्यासाठी काहीही सांगितले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. रीडिंग व बिले वितरणाच्या विषयातही त्यासंबंधीचा मक्ता दिला आहे, त्यांच्याकडून चुका होत आहेत, आम्ही काय करणार, असे कानावर हात ठेवणारे उत्तर दिले जात आहे. 

तारखे नंतर येतात बिले
या बिलाचेच उदाहरण पाहू. एक हजार ६९० रुपयांचे हे बिल आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत भरल्यास एक हजार ६९०, तत्पर भरणा केल्यास एक हजार ६७० रुपये, म्हणजे २० रुपये सवलत मिळू शकते. मात्र, तत्पर भरण्याची तारीख २७ जानेवारी असताना हे बिल ग्राहकास २८ जानेवारीला प्राप्त झाले. अशा स्थितीत ग्राहकास अपेक्षित लाभ मिळू शकला नाही. असे अनेक बिलांबाबत घडत असल्याची तक्रार आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com