
Water Pipeline Leakage : गुड्डूराजानगरात गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया!
जळगाव : शहरातील भिकमचंदनगर, गुड्डूराजानगर येथे महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे पाईप (Water Pipeline Leakage) फुटून लाखो लिटर्स पाण्याची नासाडी होत आहे.
गल्ली गल्लीतून पाणी साचलेले असून, सर्वत्र चिखल झाला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. (Lakhs of liters of water wasted due to leakage in Guddu Raja Nagar jalgaon news)
याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागात नागरिकांनी तक्रार केली आहे; परंतु यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी गुड्डूराजानगर येथील नागरिकांनी केली आहे. महापालिकेने अमृत योजना अंतर्गत नागरिकांना नवीन नळ कनेक्शन दिलेले आहेत.
परंतु हे कनेक्शन देत असताना जुनी व नवीन पाईपलाईन काही ठिकाणी तुटलेली असून, पाईप गळतीमुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून अक्षरशः लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. त्यामुळे कॉलनीत ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे, चिखलामुळे मच्छर वाढले असून, आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
या अत्यंत संवेदनशील महत्त्वाच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. नागरिकांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन पाईपलाईनची गळती त्वरित थांबवावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काही तक्रारदारांनी दिला आहे. स्थानिक नगरसेवक आणि संबंधित विभागाने लक्ष घालून गुड्डूराजानगर येथील ही समस्या सोडवावी, अशी विनंती केली आहे.