सदोष बियाण्यामुळे ज्वारीचे नुकसान !

सदोष बियाण्यामुळे ज्वारीचे नुकसान !

चोपडा : तालुक्यातील वर्डी येथील काही ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी हायटेक हायब्रीड सीड्स या कंपनीच्या ३२०६ या वाणाची पेरणी केली होती. वेळेवर खत व्यवस्थापन, कीटकनाशक, पाणी व्यवस्थापन करूनही ज्वारीच्या कणसांना पूर्णपणे दाणेच भरलेले नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याची तत्काळ दखल घेत त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना भरपाई त्वरित मिळवून द्यावी, अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे कैफियत मांडली.

 
वर्डी (ता. चोपडा) येथील साहेबराव फकिरा पाटील, वासुदेव पंडित पाटील, कैलास सोनू पाटील, पांडुरंग माधराव धनगर तसेच साहेबराव शंकर पाटील आदी शेतकऱ्यांनी हायटेक हायब्रीड सीड्स या कंपनीचे ३२०६ हे वाण पेरले होते. वेळेवर खत व्यवस्थापन, कीटकनाशक, पाणी व्यवस्थापन करूनही ज्वारीच्या कणसांना दाणेच भरलेले नाहीत. विरळ दाणे आले असल्याचा प्रकार दिसून येत आहे. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात हाच प्रकार दिसून येत आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांची कृषी विभागाने दखल घेऊन संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, किरण गुजर उपजिल्हाध्यक्ष, सचिन सोनवणे तालुकाध्यक्ष, विनोद धनगर प्रगतिशील शेतकरी, गणेश पाटील, प्रभाकर शिंदे, भूषण पाटील, गुणवंत पाटील, सागर पाटील, अविनाश शिंदे यांनी केली आहे. कृषी विभागाने तत्काळ दखल घ्यावी; अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे. 

लाखोंचे नुकसान 
वर्डीसह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी हायटेक हायब्रीड सीड्स या कंपनीचे ३२०६ या वाणाची ज्वारीची पेरणी केली होती. १२ शेतकऱ्यांनी ३५ ते ४० एकरात पेरणी केलेली होती. एकरी १२ क्विंटल उतारा पकडल्यास ४०० ते ५०० क्विंटल उत्पन्न बुडाले असल्याने जवळपास १० ते ११ लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. . 


हायटेक सीड्स विभागीय व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. कंपनी आपली जबाबदारी झटकत आहे. तरी कृषी विभागाने याची दखल घेऊन संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी 
- संदीप पाटील, शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष, जळगाव 



तक्रार आलेली आहे. याची दखल घेत तज्ज्ञ लोकांना बोलविणे केले असून, एवढ्या २ ते ४ दिवसांत तज्ज्ञ आल्यानंतर त्यांच्याकडून पाहणी करून ते जो अहवाल देतील तो अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल. 
- प्रशांत देसाई, तालुका कृषी अधिकारी, चोपडा 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com