3 वर्षे होऊनही नुकसान भरपाई मिळेना; शेतकरी प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmers waiting for help

3 वर्षे होऊनही नुकसान भरपाई मिळेना; शेतकरी प्रतीक्षेत

भडगाव (जि. जळगाव) : तालुक्यात ११ जून २०१९ ला झालेल्या वादळामुळे तब्बल पाऊणे सहाशे हेक्टरवरील पिके आडवी पडली होती. प्रशासनाकडून पंचनामेही करण्यात आले. मात्र, तीन वर्षे होऊनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून एक रुपयाची देखील भरपाई मिळालेली नाही. अजूनही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे भरपाई केव्हा मिळेल? असा प्रश्‍न गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

भडगाव तालुक्यात ११ जून २०१९ च्या वादळाने ८५२ शेतकऱ्यांचे ५६७ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागातर्फे संयुक्त पंचनामे करण्यात आले. त्याचा अहवाल अनुदानासाठी शासनाकडेही पाठविण्यात आला. प्रशासनाच्या दप्तरी एकूण सहा कोटीचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानीनंतर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले आहे. विशेष म्हणजे, या नुकसानीनंतर पुन्हा झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना वितरीत झाले आहे. मात्र, तीन वर्षांपासून भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या वडजी, पिचर्डे, बात्सर, कोठली, बोरनार, बोदर्डे, निंभोरा भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनाच्या मदतीच्या निकषानुसार १ कोटी दोन लाखांचे अनुदान अपेक्षित आहे.

हेही वाचा: बनावट लग्नप्रकरणी फरार तिघांना अटक

सुधारीत प्रस्ताव सादर करुनही दखल नाही

आमदार किशोर पाटील यांनी नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरु ठेवला आहे. २६ एप्रिलला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी नव्याने प्रस्ताव सादर करण्याची सूचना करुन सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर कृषी विभागाने तत्काळ २९ एप्रिलला नवीन सुधारीत प्रस्ताव सादर केला. त्याला आता सव्वा दोन महिने होऊनही पुढे काहीही हालचाल झालेली नसल्याचे दिसत आहे.

पीक निहाय झालेले नुकसान

पिकाचा प्रकार क्षेत्र(हेक्टरमध्ये)

केळी ............... ४९३.५६

लिंबू ............... ३६.२९

मोसंबी ............. १६

पपई ................ ९.३६

डाळिंब ............. १२

हेही वाचा: बनावट लग्नप्रकरणी फरार तिघांना अटक

''शेतकऱ्यांचे झालेले नुकसान स्वतः डोळ्यांनी पाहिले होते. भरपाईसाठी तीन वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करतो आहे. त्यावर एप्रिलमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे बैठकही झाली होती. त्यांनीही अनुदान देण्याबाबत सकारात्मकता दाखवल्याने आपण कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देऊ.'' - किशोर पाटील, आमदार ः पाचोरा-भडगाव

''वादळामुळे झालेल्या नुकसानीला तीन वर्षे होऊनही भरपाई मिळालेली नाही. शेतकरी केवळ आश्वासनांच्या झुलत्या मनोऱ्यावर डोळे लावून बसले आहेत. भरपाई मिळणार नाही, असे तरी शासनाने एकदा सांगून द्यावे म्हणजे शेतकरी आशा सोडतील.'' - दीपक महाजन, तालुकाध्यक्ष ः राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल, भडगाव

Web Title: Farmers Waiting For Compensation From 3 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top