
Crime News: फरारी ‘अरुण गवळी’ अटकेत; न्यायालय आवारातून लघुशंकेचा बहाणा करून ठोकली धूम
जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयित अरुण भगवान गवळी याने न्यायालयाच्या (Court) आवारात लघुशंकेला जाण्याचा बहाणा करीत पलायन केले होते. (Fugitive Arun Gawli arrested team of local crime branch arrested him in Buldhana within 24 hours jalgaon news)
तो नेमका कोणत्या दिशेने पळाला येथून शोध सुरू झाला. अखेर रात्री पावणेदहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत त्याला बुलढाणा येथे अटक केली.
पाचोरा पोलिस ठाण्यात दाखल बाललौंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अरुण भगवान गवळी (वय २२, रा. गुम्मी, ता. जि. बुलढाणा) याला पोलिसांनी अटक केली होती. कोरोना काळात मिळालेल्या जामिनावर तो बाहेर होता.
सोमवारी (ता. २०) त्याला ताब्यात घेत पोलिस जिल्हा न्यायालयात हजर करणार होते. हवालदार विजय पाटील त्याला जिल्हा न्यायालयात घेऊन आले असता, दुपारी पावणेपाचच्या सुमारास अरुण गवळी याने लघुशंकेचा बहाणा केला.
हवालदार विजय पाटील त्याला लघुशंकेसाठी घेऊन गेले. पोलिसांची नजर चुकवून अरुण गवळी याने पळ काढला. याप्रकरणी विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक सचिन वाघ तपास करीत आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
बेड्यांना नकार अन् पोलिसाला शिक्षा
संशयिताला न्यायालयात बेड्या लावून हजर करू नये, असे सर्वसधारण निर्देश आहेत. परिणामी, न्यायालयीन आवारात संशयितांच्या बेड्या काढाव्या लागतात. ही संधी साधून संशयिताकडून लघुशंकेचा बहाणा केला जातो.
न्यायालय असो, की जिल्हा रुग्णालयात शौचालयांत अस्वच्छता आणि उग्र अमोनियाचा दर्पामुळे संशयिताला तिथपर्यंत नेऊन पोलिस बाहेरच थांबतो. नजर चुकली, की गुन्हेगाराला पळण्याची संधी मिळते, हेच अरुण गवळी या प्रकरणातही झाले. फरारी संशयित सापडला, तरी त्याला न्यायालयात घेऊन येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबनाची शिक्षा मात्र भोगावी लागेल, हे निश्चित
बुलढाण्यातून केली अटक
न्यायालयात हजर केलेला संशयित फरारी झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकातील महेश महाजन, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, भरत पाटील यांनी रेल्वेस्थानक, बसस्थानकसह ठिकठिकाणी शोध घेतला.
अखेर त्याच्या मुळगावी पोलिस पथक पोचल्यावर अरुण गवळी याला ताब्यात घेण्यात आले. २४ तासांच्या आत संशयिताचा शोध घेतल्याने गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी अभिनंदन केले.