
स्मशानात अंत्यसंस्काराची तयारी, दवंडी अन् स्वच्छताही, बेबाबाईंचा संघर्षमयी प्रवास
कापडणे : स्मशानभूमी म्हटले म्हणजे अंगावर शहारे येतात. बऱ्याचशा लोकांमध्ये स्मशानभूमीबद्दल अनामिक भीती असते. विज्ञानयुग सुरू झाले, तरी स्मशानभूमीबद्दलच्या दंतकथा बंद झालेल्या नाहीत. मात्र, अशा काळातही स्मशानभूमीमधूनच रात्री-अपरात्री डोली अथवा किडी नेणे, अंत्यसंस्काराची तयारी करणे आदी कामे एखादी महिला करीत असेल, तर कदाचित ती अतिशयोक्ती वाटेल. पण, धमाणे (ता. धुळे) येथील बेबाबाई मातंग या गेल्या पंधरा वर्षांपासून हे काम करीत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही त्या न घाबरता लढल्या. पती निधनानंतरचा त्यांचा हा संघर्ष चित्तथरारकच आहे..!
हेही वाचा: 7,200 कर्मचाऱ्यांची पोलीस भरती गृहखातं स्वत:च करणार, घोटाळे टाळण्यासाठी निर्णय
मुंबई-आग्रा महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धमाणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची विविध कामे बेबाबाई करतात. ज्या घरी निधन झाले, त्या अंगणात खराटा फिरविणे, त्यानंतर गावापासून एक किलोमीटरवरील स्मशानभूमीत येणे, तेथील किडी अथवा डोली उचलून बैलगाडीत किंवा गाडीत ठेवून गावात आणणे, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी आदी कामे त्या करतात.
हेही वाचा: निवडणुकीसाठी बायको हवी बॅनर लावणं अंगलट, चाकणकर म्हणाल्या...
कोरोनात न घाबरता त्या लढल्या
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली. भीती वाटली नाही. घाबरल्याही नाहीत. त्यामुळेच त्यांना प्रशासनाने कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करायला हवे, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.
होय, दवंडी अन् स्वच्छताही..!
एवढेच नव्हे, तर गाव स्वच्छ ठेवण्याची कामेही त्या अविरत करीत आहेत. ग्रामस्थ त्यांना हक्काने हाक देतात. त्या धावत स्वच्छतेचे कामे तडीस नेतात. मृत जनावरे गावाबाहेर ओढून नेण्याचे काम कर्तव्य म्हणून पार पाडतात. दवंडीही देतात. घरोघरी जाऊन शासनाचा संदेशही पोचवितात. याचा मोबदला मात्र अल्प मिळतो, हे त्या खेदाने सांगतात. त्याचवेळी गाव गुणी आहे. पोटाला चार घास देते, हेदेखील अभिमानाने सांगतात.
हेही वाचा: पुणे : सिंहगडाच्या घाटात दुचाकीने पेट घेतल्याने वाहतूक कोंडी
पती निधनानंतरचा संघर्ष
त्यांचे पती गोपीचंद मातंग यांच्या निधनानंतर, म्हणजे साधारणतः पंधरा ते सोळा वर्षांपासून त्या पतीच्या जागी सर्व कामे करीत आहेत. त्यांना तीन मुली असून, दोघींचा विवाह त्यांनी थाटामाटात लावला. तिसरीला शिकवून मोठे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. मुलींना सांभाळतानाच आता नातवंडांचेही लालनपालन त्या करू लागल्या आहेत. पोटासाठीचा त्यांचा संघर्ष वाखणण्यासारखा आहे.
त्यांना हवीय मदत...
बेबाबाई मातंग यांच्या या संघर्षाची दखल अद्याप कोणी घेतलेली नाही. विधवा म्हणून शासनाचे अल्प वेतनही नाही. विविध सुविधांपासूनही त्या वंचित आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सगळ्यांचा सलाम आहे. पण, मदतीला कोणीही पुढे आलेले नाही, हेही तितकेच खरे आहे.
Web Title: Funeral And Cremation Preparation Dawandi And Cleanliness Bebabai Struggling Journey
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..