
Jalgaon Crime News: तरुणाकडून पैसे लाटणाऱ्या टोळीचा डाव फसला; तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ : बलवाडी (ता. रावेर) येथील एका शेतकऱ्याच्या मुलाचे जळगावातील टोळीने अपहरण करून त्याच्याकडून दोन लाख रुपये लाटले व पुढील उर्वरित एक लाखांची रक्कम घेण्यासाठी भुसावळ येथे आले असता संशयावरून नागरिकांनी तपासणी केली असता हा प्रकार गुरुवारी (ता.२३) रात्री उघडकीस आल्याने तरुणांकडून पैसे लाटणाऱ्या टोळीचा डाव फसला. नागरिकांनी तिघांना बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
रावेर तालुक्यातील बलवाडी येथील सुशील शांताराम तायडे (प्लॉट नं ६७, आदर्श नगर, जळगाव) हे कृषी कंपनीत नोकरी करतात. त्यांना बुधवारी (ता. २२) रात्री साडेआठच्या दरम्यान मोबाईलवरून महिलेचा फोन आला. तुम्ही तायडे आहेत का? तुम्हाला भेटायचे आहे, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.२३) सकाळी दहाच्या दरम्यान पुन्हा महिलेने फोन केला असता तायडे यांनी सांगितले, की दुपारी तीनला रिंग रोडजवळ भेटतो.
दुपारी जळगाव गाठून तीनला सुशील शांताराम तायडे यांनी भेट घेतली असता त्या महिलेने तायडे ज्या कारने आले त्या वाहनात बसून सोबत चार साथीदार घेऊन रवाना झाले. या दरम्यान सुशील तायडे यांच्याकडून टोळीने दोन लाख रुपये घेऊन उर्वरित रक्कम एक लाख रुपये घेण्यासाठी भुसावळ येथील खडका चौफुलीजवळील उड्डाण पुलाखाली तायडे असता त्यांना पैसे मागव असा हट्ट करीत डांबून ठेवले.
याबाबत सुशील तायडे यांनी एक लाख रुपये त्यांच्या वडिलांना घेऊन येण्यास सांगितले असता त्यांच्या वडिलांना एवढे पैसे अचानक मागितल्याने शंका निर्माण झाली. त्यांनी तत्काळ यांची माहिती निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांना कळविली असता त्यांनी सुशील तायडे यांचे फोन लोकेशन काढले.
भुसावळ येथील खडका चौफुली दाखविले. सुशील तायडे यांचे वडिलांनी भुसावळ शहरातील वाल्मिकनगर येथील बारसे यांच्याशी संपर्क साधला व घटनेबाबत माहिती देऊन खडका चौफुलीजवळ पोचण्यास सांगितले असता त्याठिकाणी सुशील तायडे यांची कार (क्रमांक एमएच.१९, सीझेड.३६७१) उड्डाण पुलाखाली आढळून आल्याने काही तरी गडबड आहे, हे स्पस्ट झाले.
तत्काळ त्यांनी वाहन तपासणी केली असता त्यामध्ये सुशील तायडे हा आढळून आला. नागरिकांनी घटनास्थळी जमाव करीत त्यांच्या तावडीतून सुशील तायडेची सुटका केली व पोलिसांना कळवून तीन संशयितांना बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर घटनेची शहानिशा करीत गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्यापेठ पोलिस ठाण्यात जळगावला संशयित व फिर्यादीस पाठविले.
गडविणारे रॅकेट?
पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले असता यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या टोळीने असे कित्येक तरुणांना गंडविले असून, लाखोंची माया जमविली असल्याचे नाकारता येत नाही.