गिरीश महाजनांविषयी सिडी, पॅनड्राईव्ह; म्हणाले ' ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है !

गिरीश महाजनांविषयी सिडी, पॅनड्राईव्ह; म्हणाले ' ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है !

जामनेर: भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी सत्ताकाळात दबावतंत्राचा वापर करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमविली आहे. तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या जमिनीही कमी भावात घेतल्या आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे, असा आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत केला. 

जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. या वेळी ललवाणी म्हणाले, की गिरीश महाजन यांच्यासह इतर अनेकांनी ‘बीएचआर’च्या मालमत्ता अत्यंत कवडीमोल भावात घेऊन ठेवीदारांचे नुकसान केले. त्यामुळे आजही लाखो गोरगरीब ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळाली नाही. अशा सर्व ‘बीएचआर’च्या ठेवीदारांनी आपल्याला साथ दिल्यास त्यांच्या थेट घरावर थाळीनाद करून भव्य मोर्चा काढणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

महाजनांनी बीएचआर मधून एक हजार कोटीची केली कमाई

‘बीएचआर’च्या माध्यमातून महाजनांनी सुमारे एक हजार कोटींची कमाई केली असल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केला. अधिकारी वर्गाला हाताशी धरून दबाव आणून माझ्यासह सहकाऱ्यांवर खोटेनाटे गुन्हे दाखल केले.  

महाजनांजवळ संपत्ती आली कशी? 
महाजन यांनी सत्ताकाळात कमविलेल्या संपत्तीवर आक्षेप घेऊन ललवाणी म्हणाले, की आमदार महाजनांचा जामनेर शिक्षण संस्थेच्या मालमत्तांवरही आधीपासूनच डोळा आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या अधिकृत परवानग्या न घेता बीओटी मार्केटमधील गाळे अव्वाच्या सव्वा भावात विक्री करून सुमारे दोनशे कोटी रुपये कमविले. शेतकी संघाच्या व्यापारी गाळ्यांबाबतही हेच सुरू आहे. पळासखेड्याजवळही त्यांनी आत्ता मालमत्ता खरेदी केली, एवढा पैसा त्यांच्याजवळ आला कोठून, याचाही शोध घेणे गरजेचे आहे. मी लवकरच वरील या सर्व गैरव्यवहार प्रकरणासंबंधातील कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यावर न्यायालयात जाणार असल्याचे ललवाणी यांनी सांगितले. या वेळी अखेरीस ललवाणी यांनी त्यांच्याजवळील एक सीडी व पेनड्राइव्ह पत्रकारांना दाखविला. मात्र, त्यात काय आहे, याविषयी ते काहीच सांगू शकले नाही. ‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे’, असेही त्यांनी सांगितले. 


खडसे-ललवाणींची भेट अन् राजकीय तर्क 
पारस ललवाणी यांची पत्रकार परिषद संपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे तेथे आगमन झाले. या वेळी खडसे म्हणाले, की मुंबईकडे जात असल्याने भेटीसाठी बोलावले म्हणून येथे आलो. दरम्यान, ललवाणी यांच्याशी चर्चा करून श्री. खडसे पहूरकडे मार्गस्थ झाले. ललवाणींची पत्रकार परिषद संपताच खडसेंचे आगमन झाल्याने राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

आवर्जून वाचा- दिलासादायक: घरापासून दुरावलेले २४१ बालक पून्हा आपल्या पालकांच्या कुशीत सामावले -

..,असे आहेत ललवाणींचे आरोप 
- विरोधी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून राजकीय संघटन वाढविले. 
- तत्कालीन पोलिस निरीक्षक नजीर शेख यांचा वापर करून गुन्हे व तडजोड करून घेण्याची धमकी. 
- जीएम हॉस्पिटलसाठीही सामाजिक संस्थांकडून निधी जमा केला, नावही बदलण्यात आले. 
- राज्यभरातील आरोग्य शिबिरासाठीही पैसा गोळा केला. 
- दहा वर्षांपूर्वीचे गुन्हे आमच्यावर दाखल केले, तर तुमच्यावर तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल झाला तर त्यात गैर काय. 
- प्रा. उत्तम पवार व त्यांच्या परिवाराला त्रास दिला. त्यामुळे ते जळगावला राहायला गेले. 
- शिक्षक भरतीतही घोळ असल्याचा ठपका. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे बी. जे. पाटील यांच्यावर कारवाई करा. 

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com