पितृछत्राची उणीव..रागाच्या भरात घर सोडले अन्‌ पोहचली मुंबई

रईस शेख
Monday, 21 December 2020

सकाळी ७.३० वाजता दुध आणण्यासाठी जिनत घराबाहेर पडली. दुध घेवून परत न आल्याने तिचा शोध सुरू झाला. संध्याकाळ उलटूनही मुलगी घरी न आल्याने एमआयडीसी पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

जळगाव : मेहरूणच्या मास्टर कॉलनीतून रागाच्या भरात घरसोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीला एमआयडीसी पोलीसांनी मुंबई पोलीसांकडून ताब्यात घेतले. मुलीला सुखरूप पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पोलीसांच्या कामगिरीसह आईने खाकीचे साश्रृ नयनांनी आभार मानले. 

मेहरुणच्या मास्टर कॉलनीतील अफजल मिया कुदबुद्दीन शेख (वय-५८) हमाली करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या लहान भावाचे आठ वर्षापुर्वी निधन झाल्याने पुतणी जिनत फातेमा अफजल मिया शेख ही यांच्याकडे राहत होती. बुधवार (ता. १६ डिसेंबर) रोजी सकाळी ७.३० वाजता दुध आणण्यासाठी जिनत घराबाहेर पडली. दुध घेवून परत न आल्याने तिचा शोध सुरू झाला. संध्याकाळ उलटूनही मुलगी घरी न आल्याने एमआयडीसी पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

तपासात मुंबईचा ठिकाणा
तपासात बेपत्ता झालेली मुलगी ही मुंबईत आल्याची माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनद्वारे प्राप्त माहितीवरुन पोलिस नाईक मिलिंद सोनवणे, महिला पोलीस मालती वाडीले, होमगार्ड धिरज भगत अशांचे पथक मुंबई रवाना झाले होते. 

अनाथ बाळाचा रुसवा काढणारं कोण 
बाप आणि मुलीच नातं तस हळवं मात्र, प्रेमात घट्टच असते, इथं मात्र, जिनत कम नशिबी ठरली..ती, लहान असतांनाच पित्याचे छत्र हरपले. कुटूंबाची हलाखीची परिस्थती..त्यामुळे मोठ्या काकाकडे राहण्याची वेळ आली..एका छताखाली काही कमी अधीक झाल्यावर, कुणी काही बोलल्यावर मुलीचा राग, रुसवा बापच हळूवार पणे दुर करतो. पिताची कमतरता, परीस्थीतीचा राग म्हणुन तीने घर सोडल्याचे पोलिसांना सांगीतले. 

जीनत आईकडे 
चौकशी दरम्यान आपण रागाच्या भरात निघून गेल्याचे ती, सांगते. मुंबई पोलिसांनी तीचा तीन दिवस सांभाळ केल्यावर एमआयडीसी पेालिसांना संपर्क करुन मुलीची माहिती कळवल्याने वेळीच सुखरुप तिला घरी परत आणण्यात आले. मुलीला बघताच आई शाईनबी अब्दुल अजीज (रा. मारूळ ता.यावल) यांच्या अश्रुचा बांध मोकळा होवून मुलीला घट्ट मिठी मारतच या मावलीने पेालिसांचे आभार मानले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news small girl going home mumbai police