Jalgaon News : शेतकरी नवरा नको गं बाई! ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer husband

Jalgaon News : शेतकरी नवरा नको गं बाई! ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण

मेहुणबारे (जि. जळगाव) : विवाहेच्छूक तरुण- तरुणींचे विवाह जुळत नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. विशेषत: शेतकरीपुत्रांना पसंती नसल्याची वस्तुस्थिती आहे. विवाह जमविणाऱ्या संस्थांसह मध्यस्थींकडे विशेषतः युवकांचे ‘बायोडाटा’ जमा होताना दिसत आहेत. हल्ली विवाहेच्छूक मुलींसह त्यांच्या पालकांच्या अपेक्षा वाढल्याने अनुरूप जोडीदार मिळणे कठीण होत आहे. (girls not preferring farmers son for marriage jalgaon news)

समाजात वधू- वर निवडीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होत असले, तरीही प्रत्यक्षात मात्र वेगळीच वस्तुस्थिती आजही कायम आहे. काही तरुण पदवीधर असूनही नोकरीअभावी बेरोजगार आहेत. काही जण खासगी नोकरी करूनच समाधान मानत आहेत.

शहरासारखी वधू-वर सूचक मंडळात नावनोंदणीची पद्धत आता ग्रामीण भागातही येऊन पोचली आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी उपवर मुला-मुलींच्या विवाहात फारशा अडचणी येत नव्हत्या. मुलाच्या घरची परिस्थिती, त्यांचे वागणे, घरातील माणसे, शेती, नोकरी, व्यवसाय आदी बाबीचा प्राधान्याने विचार केला जात होता.

हुंडा व मानपानाचा पगडा असल्याने ठराविक वयातच मुलीचे लग्न झाले पाहिजे, अशी मानसिकता असल्याने मुलांपेक्षा मुलीकडचेच लोक स्थळे शोधण्यात पुढाकार घ्यायचे. मुलीची शिकण्याची तयारी असली, तरी माहेरच्यांना त्याचा फायदा काय? सासरकडचे लोक शिकवतील, अशी धारणाही होती.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : ‘अलबत्या गलबत्या’ नाटक जळगावात

त्यामुळे जवळचे दूरचे नातेवाईक मित्राकडून माहिती घेऊन विवाह जुळवित असत. काही समाजामध्ये मुलांना समाजातील अनुरुप जोडीदार मिळत नसल्याने बहुतांश पालकांसह स्वतः मुलांनी सोलापूर पंढरपूर, नाशिक या भागातील मुलींशी विवाह केले आहेत. यात काहीची फसवणूक झाल्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत.

दरम्यान, अलिकडे जनजागृतीमुळे मुलीही डॉक्टर, इंजिनियर, वकील, एमबीए, पोलिसदल आदी क्षेत्रात चमकत आहेत. यामुळे पालकांचीही मानसिकता बदलताना दिसत आहे.

मुलींचे पालक नोकरदारालाच प्राधान्य देत असल्याने गावाकडचे तरुण विवाह जमेपर्यंत शहरांजवळच्या छोठ्यामोठ्या कंपन्यामधून नोकरी मिळवायची धडपड करतात. जर नोकरी मिळाली तर काही दिवस थांबायचे व नंतर घरी येऊन शेती करायची, असे देखील होत आहे.

नोकरदाराकडे जास्त कल

शिकलेल्या मुलींचा लग्नासाठीचा कल नोकरदाराकडे जास्त असतो. मुलगा एखाद्या कंपनीत शिपाई असला तरी चालेल, पण तो नोकरीला असला पाहिजे. नापिकी, हमी भावाचा पत्ता नाही आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीचा व्यवसाय अलिकडच्या काळात अडचणीचा होत चालला आहे. त्यामुळे आजच्या पिढीच्या मुली 'शेतकरी नवरा नको गं बाई...' या मानसिकतेपर्यंत येऊन पोहोल्या आहेत.

हेही वाचा: Jalgaon News : Whats App वर येणार आता धान्य आल्याचा संदेश