Jalgaon News : दिव्यांग मुख्याध्यापिका डायलिसिस वर; शासनाने वेतन थकविल्याने उपासमारीची वेळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salary not given to worker

Jalgaon News : दिव्यांग मुख्याध्यापिका डायलिसिस वर; शासनाने वेतन थकविल्याने उपासमारीची वेळ!

जळगाव : चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अंधशाळेतील दिव्यांग (Disability) मुख्याध्यापिकेसह सहा दिव्यांग शिक्षक,

इतर बारा शिक्षकांचे फेब्रुवारी २०२२ पासून वेतन नसल्याने त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. (Government has exhausted salary of 18 people Including Headmistress with disabilities jalgaon news)

विशेष म्हणजे, २६ जानेवारी २०२३ पासून मुख्याध्यापिका प्रभा महादेव मेश्राम या ‘डायलिसिस’वर आहेत. जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभागाला या शिक्षकांची दया केव्हा येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय अंधशाळेच्या मुख्याध्यापिका प्रभा मेश्राम दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. संगीतशिक्षक अभय कसबे, विशेष शिक्षक अशोक पाटील, संजय घोडेराव, कलाशिक्षक भाईदास बागूल, ज्ञानेश्वर अल्हाटे हेही दिव्यांग आहेत. यांसह एकूण १८ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना १ फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अशा एक वर्षांचे वेतन अदा झालेले नाही.

याबाबत जिल्हा परिषदेने दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे (पुणे) वेतनासाठी एक कोटी ३५ लाख ६८९ रुपयांचे अनुदानाची मागणी केली आहे. त्यावर आयुक्त कार्यालयाने नोव्हेंबर २०२२ मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिवांना पत्र पाठवून अनुदान देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दरम्यान, वेतन नसल्याने दिव्यांग शिक्षकांसह इतर शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उधार, उसनवार करून किती दिवस काढणार. शासनाने वेतन दिले तरच उदरनिर्वाह चालेल, अशी परिस्थिती आहे.

मुख्याध्यापिका मेश्राम यांना किडनीचा त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. या वेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे माजी सचिव, वृक्षमित्र अरुण निकम यांनी पन्नास हजारांची मदत केली.

सध्या डॉ. पवानी यांच्याकडे त्या उपचार घेत आहेत. आपले थकीत वेतन मिळावे, यासाठी प्रभा मेश्राम यांनी लोकप्रतिनिधींकडे देखील दाद मागितली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे मेश्राम यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

"अनुदान मिळाले, की पगार बिले टाकली जातात. आतापर्यंत अनुदान आलेले नव्हते. आता आले आहे. पगार बिले कोशागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. आठ दिवसांत संबंधित शिक्षकांना वेतन मिळेल." - विजय रायसिंगे, समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद