Jalgaon News | बस ‘चालक’ बसमधील ‘प्रवाशांचा तारणहार’ : पालकमंत्री गुलाबराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil while starting the road safety campaign. Sub Regional Transport Officer Shyam Lohi, Department Controller Bhagwan Jaganor etc

Jalgaon News | बस ‘चालक’ बसमधील ‘प्रवाशांचा तारणहार’ : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : रस्ता सुरक्षा सामूहिक जबाबदारी आहे. रस्ता सुरक्षा केवळ अभियान काळापुरते मर्यादित न ठेवता नेहमीसाठी याची अंमलबजावणी करा.

रस्ता सुरक्षा काळाची गरज असून, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून रस्ता सुरक्षा अभियान लोकचळवळ निर्माण करून जास्तीत जास्त जनजागृती करून रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करा. वाहनचालक नुसता ‘चालक’ नसून तो बसमधील ‘प्रवाशांचा तारणहार’ असतो.

बसचालक म्हणजे अर्जुनाचा रथ चालविणारा कृष्णच आहे. दळणवळण व वाहतूक क्षेत्रातील चालक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी (ता. ११) येथे केले. (Guardian Minister Gulabrao Patil statement about bus driver on Start of Road Safety Campaign Jalgaon News)

हेही वाचा: Nashik Political News : आगामी निवडणुकीत भाजप- सेना युतीचा भगवा; मुख्यमंत्र्यांना दिला शब्द

येथील एस. टी. महामंडळात रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, एसटी महामंडळाचे नियंत्रक भगवान जगनोर उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की माझा राजकीय प्रवास एसटी महामंडळाच्या बसने सुरू झाला. निरंतर बसने ये-जा करीत असल्यामुळे एसटी महामंडळाच्या अडीअडचणी चांगल्याप्रकारे माहिती आहेत.

सध्या खासगी वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळे एसटीचालकांना रस्त्यावर बस चालवत असताना अनेक समस्या निर्माण होतात. तरीही आजही एसटी महामंडळाचा प्रवास सुरक्षित आहे. एसटी महामंडळाची भरभराट करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लोही यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे कौतुक करत सुरक्षित वाहन चालविण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सुरक्षित वाहन म्हणून आजही एसटीकडे पाहिले जाते. खासगी वाहनांपेक्षा एसटीच्या प्रवासाला प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात प्राधान्य असल्याचे सांगितले.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Jalgaon News : लहान मुले, मधुमेहींसाठी बनवले Zero Suger Choclate

प्रास्ताविकात कामगार अधिकारी कमलेश भावसार यांनी मोटार वाहन अपघातास परिणामकारक आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती विशद केली. वाहक गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वाहक संदीप सूर्यवंशी यांनी आभार मानले.

सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव, सांख्यिकी अधिकारी रवींद्र पवार, विभागीय वाहतूक अधीक्षक दिलीप बंजारा, लेखाधिकारी मिलिंद सांगळे, आस्थापना अधिकारी प्रशांत महाजन, आगार व्यवस्थापक नीलिमा बागूल, स्थानकप्रमुख मनोज तिवारी, इंटक जनरल सेक्रेटरी नरेंद्रसिंग राजपूत, कामगार सेना विभागीय सचिव आर. के. पाटील, कामगार संघटना विभागीय अध्यक्ष विनोद शितोळे, प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.

२५ वर्ष विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार

२५ वर्ष विनाअपघात सेवा देणाऱ्या अरुण कोळी, रवींद्र सोनवणे, लक्ष्मण नन्नवरे, मोतीलाल नन्नवरे, शरद सोनवणे, दौलतराव निकम या चालकांचा प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात उत्पन्नाबाबत जळगाव विभागाचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल विभाग नियंत्रक जगनोर यांचा सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला.

हेही वाचा: Jalgaon News : ‘फायनान्स’ कार्यालयाची तोडफोड प्रकरण भोवले; तालुका प्रमुखा विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल