
Jalgaon News: जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी 931 कोटी : पालकमंत्री पाटील
जळगाव : राज्याचे अंदाजपत्रक ९ मार्चला सादर झाले. त्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघात रस्ते, पूल व शासकीय इमारतींसाठी सुमारे ९० कोटी निधी मंजूर झाला आहे.
यात धरणगाव येथे शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम, तहसील निवासस्थान बांधकाम, जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागांर्तगत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग व त्यावरील पुलांच्या विकासासाठी निधीचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील रस्ते व त्यावरील पुलांच्या एकूण ४४५ रस्ते विकासासाठी एकूण तब्बल ९३१ कोटी ४८ लाख निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (Gulabrao Patil statement 931 crores for road development in district jalgaon news)
रस्त्यांच्या विकासातून शेतकऱ्यांचे हित साध्य होणार असून, दळणवळणाची साधने चांगली उपलब्ध होतील. रोजगार व उद्योगवाढीला चालना मिळेल. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात व मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणण्यात येणार आहे. त्यामुळे विकासाला मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद मंजूर रस्त्यांचा होणार कायापालट
जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १७ रस्त्यांच्या व मोऱ्या बांधकामासाठी १२ कोटी ६० लक्ष निधी मंजूर झाला आहे. धरणगाव तालुक्यातील अनेक रस्ते, मोऱ्यांचा त्यात सामावेश आहे. बहुतांश रस्ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग व त्यावरील पुलांच्या एकूण ४४५ रस्ते विकासासाठी एकूण तब्बल ९३१ कोटी ४८ लाख निधी मंजूर झाला आहे.
यात भुसावळ विभागातील २०६ रस्त्यांच्या कामांसाठी ३६५ कोटी ७७ लाख ५० हजार, जळगाव उत्तर विभागातील ९६ रस्त्यांच्या कामांसाठी ३१५ कोटी ३४ लाख ५० हजार, जळगाव क्रमांक दोन विभागातील ७१ रस्त्यांच्या कामांसाठी ११६ कोटी ४६ लाख, तर अमळनेर विभागातील ७२ कामांसाठी १३३ कोटी ९० लाख निधी मंजूर झाला आहे.
"माझ्या मतदारसंघात रस्ते, पूल व शासकीय इमारतींसाठी सुमारे १०० कोटी तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविल्याप्रमाणे जिल्ह्याच्या केवळ रस्ते व पुलांच्या कामांसाठी एकूण ९३१ कोटी ४८ लाख निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट अंतर्गत मंजूर केले आहेत. पूल व रस्त्यांचा होणारा विकास ग्रामीण व शहरी भागासाठी वरदान ठरणारा आहे." -गुलाबराव पाटील, पालकमंत्री