बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर मार्गाचे काम ‘एमओटी’वर; महाराष्ट्र हद्दीसाठी निर्णय

बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर मार्गाचे काम ‘एमओटी’वर; महाराष्ट्र हद्दीसाठी निर्णय

जळगाव : तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर मार्गाच्या राष्ट्रीय महामार्गातील प्रवासांत अनेक तांत्रिक अडचणी असल्याने त्याचे काम महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत ‘एमओटी’ अर्थात ‘देखभाल-दुरुस्ती, वापर व नंतर हस्तांतर’ या तत्त्वावर होणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव बांधकाम विभागाने शासनास सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातला जोडणारा दुवा म्हणून बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर राज्य महामार्ग या तिन्ही राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. २०१६ पासून घोषणा होऊनही हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग होऊ शकला नाही. त्यामुळे त्याचे चौपदरीकरण व रुंदीकरणही रखडले आहे. ‘सकाळ’ने ‘व्यथा रस्त्याची’ या वृत्तमालिकेत महामार्गाच्या कामातील अडचणींसह स्थितीवर नुकताच प्रकाशझोत टाकला. 

मार्गाची दुरवस्था 
आधीच अरुंद त्यातही ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात नेहमीच होत असतात. विशेष म्हणजे या मार्गावर लागणाऱ्या गावांच्या परिसरारात तर रस्त्याची खूपच दुरवस्था झाली असून, वाहन चालविणे कठीण बनले आहे. सोमवारी पहाटे किनगावजवळ झालेल्या अपघातात १५ मजूर ठार झाल्याची घटना ताजीच आहे. त्यामुळे महामार्गाच्या विस्तारीकरणाची अत्यंत गरज आहे. 

‘एमओटी’ तत्त्वावर काम 
या रस्त्यावरील अवजड वाहतुकीची वर्दळ, वाढलेल्या प्रवासी वाहतुकीमुळे हा मार्ग सुस्थितीत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे काम देखभाल- दुरुस्ती, वापर आणि त्यानंतर हस्तांतर (एमओटी) अशा तत्त्वावर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगणयात आले. बऱ्हाणपूरपासून अंकलेश्‍वरपर्यंत सुमारे ४०० किलोमीटरच्या या मार्गात महराष्ट्राची हद्द जवळपास २२० किलोमीटरपेक्षा अधिक आहे. या हद्दीत ‘एमओटी’ तत्त्वावर मार्गाचे काम करण्याचे नियोजन सुरू आहे. 
 

सर्व भाजपचे खासदार तरीही... 
खरेतर या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणे अथवा चौपदरीकरण कठीण असले तरी मार्ग ज्या पाच-सहा खासदारांच्या कार्यक्षेत्रातून जातो ते सर्वच खासदार भाजपचे आहेत. त्यात बऱ्हाणपूर (नंदकुमार चौहान), रावेर (रक्षा खडसे), जळगाव (उन्मेष पाटील), धुळे (डॉ. सुभाष भामरे), नंदुरबार (डॉ. हीना गावित), नवसारी (सी. आर. पाटील) असे व पुढेही भाजपचे खासदार आहेत. पैकी मध्य प्रदेश व गुजरातमध्ये भाजपचेच शासन आहे. तरीही या मार्गातील कामांत अडचणी कशा येताय? यात लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडतोय का, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. 

किमान दुपदरीकरण व्हावे 
या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था बघता चौपदरीकरण शक्य नसेल तर किमान दुपदरी मार्ग व्हावा, अशी नागरिकांची अपेक्ष आहे. खासदार रक्षा खडसे यांनी याबाबत नुकतेच रस्ते वाहतूक मंत्रालयास पत्र दिले आहे. मात्र, सर्वच खासदारांचा त्यासाठी पाठपुरावा आवश्‍यक आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com