Jalgaon News : व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर अश्रूंची धार.. आत्तेभावाच्या हळदीपूर्वीच बहिणीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon News : व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर अश्रूंची धार.. आत्तेभावाच्या हळदीपूर्वीच बहिणीचा मृत्यू

जळगाव : आतेभावाच्या हळदीसाठी दुचाकीवरून (Bike) निघालेल्या विवाहितेचा पाळधी जवळच सुसाट डंपरने धडक देत देान्ही पायावरून चाक गेल्याने जागीच तिचा मृत्यू ओढवला. (hit by dumper women died on the spot jalgaon news)

लग्न समारंभात मुलाच्या हळदीला बहिणांना मान असतो मात्र, आतेभावाला हळद लागण्यापूर्वीच बहिणीचा दुदैवी मृत्यू ओढवल्याने व्हॅलेन्टाइन-डे या प्रेम दिनाच्या मुहूर्तावर होत असलेल्या लग्नमंडपात शांततेसह अश्रुबांध दाटून आला होता. अगदी साध्यापद्धतीने लग्न आटोपण्यात आले. कविता प्रशांत चौधरी (वय-३७, रा. झुरखेडा ता.धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

झुरखेडा(ता.धरणगाव) येथील विवाहिता कविता प्रशांत चौधरी यांची आत्या जळगाव शहरातील शिवकॉलनीत राहतात. आत्याच्या मुलाचे मंगळवार (ता.१४) रोजी लग्न असून हळदीचा कार्यक्रम सोमवारी (ता.१३) होता.

कविता चौधरी यांचे शेजारी विलास देविदास चौधरी यांचे जळगावात कृषीकेंद्र असून ते दररोज दुचाकीने जळगावला अप-डाऊन करतात. म्हणून कविता चौधरी या विलास चौधरी यांच्या सोबत दुचाकीने हळदीसाठी निघाल्या होत्या. दुचाकीने येत असताना पाळधी गावाच्या पुढे राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल गोविंदा समोर सुसाट वेगात येणाऱ्या वाळू डंपर (जी.जे-०३, बी. वाय ६८३१) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

यात दुचाकीस्वार विलास चौधरी आणि कविता प्रशांत चौधरी असे दोघेही रस्त्यावर विरुद्ध दिशेला फेकले गेले. यात कविता यांच्या दोन्ही पायावरून डंपरचे चाक गेल्याने कविता यांचा जागीच मृत्यू झाला, तर विलास यांच्या डोक्याला, पायाला आणि डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

अपघातानंतर तत्काळ रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी थांबत पाळधी पोलिस आणि ॲम्बुलन्सला फोन करून कविता चौधरी यांना रुग्णालयात हलविले. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यावर तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं.

विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती कळताच कुटुंबीयांसह पाडळसरे, झुरखेडा आणि पाळधी येथील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाळधी पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी अपघाताला कारणीभूत डंपर ताब्यात घेतला. डंपर चालक फरार झाला आहे.

व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर अश्रूंची धार..

मयत कविता चौधरी यांच्या आत्येभावाचा ‘व्हॅलेंटाईनच्या- डे’ या प्रेमदिनाचा मुहूर्तसाधून विवाह सोहळा ठरविला होता. मात्र बहिण कविता चौधरी यांच्या अपघाती मृत्यूमुळे लग्नमंडपात अश्रुधारा तरळल्या.. नातेवाइकांनी अगदी साधे पद्धतीने हा विवाह सोहळा उरकला.

मयत कविता चौधरी यांच पाडळसरे येथील माहेर असून त्या कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर गुर्जर यांच्या कन्या तर पाडळसरे पोलिस पाटील उमाकांत पाटील यांच्या बहिण होत. कविता चौधरी यांच्या पश्चात पती, मुलगा सत्यम (वय १४), मुलगी भूमिका (वय १२) असा परिवार आहे.