Latest Marathi News | गिरणेतील निर्माणाधीन पुलालगतचे पात्रही ओरबाडणे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News

Jalgaon News : गिरणेतील निर्माणाधीन पुलालगतचे पात्रही ओरबाडणे सुरू

जळगाव : गिरणा पात्रातील बांभोरीजवळील पुलासभोवतालच्या वाळूउपशाने पूल ‘डेंजर झोन’मध्ये गेल्याची स्थिती असताना, या पुलाला समांतर रेल्वेपूल व नव्याने होत असलेल्या बायपास मार्गावरील पुलालगतही नदीपात्र ओरबाडणे सुरूच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत कारवाई करूनही वाळूमाफियांची मुजोरी कमी व्हायचं नाव घेत नाही.

गुजरातला खानदेश, विदर्भाशी कनेक्ट करणारा दुवा म्हणून गिरणा नदीवरील महामार्गावरील बांभोरी पुलाची ओळख आहे. मात्र, वाळूमाफियांच्या मुजोरीने या पुलालगत बेसमुार वाळूउपसा होत असून, पुलाचा पायाच खचण्याची वेळ आलीय आणि त्यामुळे पूल ‘डेंजर झोन’मध्ये आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पुलाचे नव्याने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचा विषय ‘सकाळ’ने मांडल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने त्याबाबत संमती दर्शवली आहे. (Illegal Sand Smuggling in Girna river Bridge Jalgaon News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jalgaon Crime News : तरुणाच्या आत्महत्येतून दंगल

रेल्वेपुलालाही धोका

महामार्गावरील बांभोरी पुलालगत दोनशे मीटरपर्यंतच्या अंतरात वाळूउपशाला बंदी आहे. ती पाचशे मीटरपर्यंत वाढविण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली खरी. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उलटपक्षी आता वाळूमाफिया थेट बांभोरी पुलाला समांतर रेल्वेपुलापर्यंतच्या साईटपर्यंत पोचले असून, त्या ठिकाणाहून वाळूउपसा होत आहे. त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

नव्या पुलाच्या कामावर प्रश्‍न

बांभोरीचा पूल धोक्यात, रेल्वेपुलालगतही गंभीर स्थिती निर्माण होत असताना, वाळूमाफियांची वक्रदृष्टी आता बायपास महामार्गांतर्गत होणाऱ्या निर्माणाधीन पुलाच्या पात्रावरही पडली आहे. ज्या ठिकाणी बायपास महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणीही वाळूउपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकारांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास बांभोरी व रेल्वे पुलाचे अस्तित्व धोक्यात येईल व नव्याने निर्माण होणाऱ्या पुलाचे निर्माणाआधीच आयुष्य संपेल. प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: District Milk Union : लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट

टॅग्स :JalgaonJalgaon Girna Dam