जळगाव : जिल्ह्यात कृषी पर्यटनाला चांगले भविष्य

शेतकरी, युवकांनी पुढे येण्याची गरज : शेतीमाल, फळांना हमीभाव मिळणे शक्य
Jalgaon agri tourism Farmer need come forward Agricultural product fruit
Jalgaon agri tourism Farmer need come forward Agricultural product fruitsakal

जळगाव : भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषीवरच मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. काबाडकष्ट करून उन, वारा, पावसाची तमा न बाळगता शेतकरी पिकवितो, म्हणून आपल्याला धान्य, फळे मिळतात. तोच खरा अन्नदाता आहे. कृषिपूरक, कृषीवर आधारित उद्योगातून अनेकांना रोजगार मिळाला असला तरी ‘कृषी पर्यटन’ हे नवीन संकल्पना गेल्या वर्षात पुढे आली आहे. कृषी पर्यटन स्थळे शेतकऱ्यांना आपल्याच शेतात, गावात निर्माण करून त्यातून रोजगाराच्या अनेकांना संधी उपलब्ध होतील. त्यासाठी गरज आहे शेतकऱ्यांच्या पुढाकाराची व युवकांनी पुढे येऊन संधी स्वतः उपलब्ध करून घेण्याची.

सोमवारी जागतिक कृषी पर्यटन दिन आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद सारख्या शहरात ‘मामाचा मळा’, ‘काकाचा मळा’ अशी संकल्पना शेतात राबवून पर्यटकांना तेथे शेती कशी असते, बैलगाडी, ग्रामीण भागातील घरे, त्यातील दिवे, निसर्ग कसा असतो, फळांची बाग कशी असते, फळे स्वतःच्या हातून तोडून खाण्याचा आनंद वेगळाच कसा असतो ? असा आनंद पर्यटकांना देत कृषी पर्यटनाचे क्षेत्र विस्तारत आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, युवकांनी आपल्या शेतातच कृषी पर्यटन स्थळ विकसित करून तेथे पर्यटकांना आणून शेती कशी असते, शेतमाल कसा पिकवतात, विविध प्रकारची फळांच्या बागा लावून पर्यटकांना त्या पाहण्यास बोलावणे, शेतात वनभोजनाचा आस्वाद घेवू देणे, बैलगाडीतून शेतात फेरफटका मारणे, शेतातच शेततळे तयार करून त्यात मासे उत्पादन करणे, बोटींगची सुविधा आदी सुविधा दिल्यास पर्यटक नक्कीच येतील.

शेतकऱ्यांनी शेतात शेतमाल विक्रीस ठेवला, फळे विक्रीस ठेवली तर पर्यटक शेतमाल, फळे शेतकरी देईल त्या दरात घेतील. म्हणजेच शेतकऱ्यांना हमीभाव नक्की मिळेल. सोबतच शेतकऱ्यांना शेतमाल, फळे बाजारपेठेत नेण्यापर्यंतचा खर्चही वाचेल. शेतकरी आर्थिक बाजूने सक्षम होत जाईल, असे कृषी अभ्यासकांनी सांगितले. दुसरीकडे महिला बचत गटाकडून पापड, कुरडई, बिबड्या, शेवया आदी पदार्थ, घरगुती मसाले, विविध फळांपासूनचे पदार्थ, फळाचा रस बनवून घेऊन त्या वस्तूंचीही विक्री पर्यटनासाठी आलेल्यांना करता येईल. ग्रामीण भागातील महिला, युवकांना यातून रोजगाराच्या संधी मिळेल. आता तीन फूट असणाऱ्या बोन्साय झाडांना आंबा, फणस, नारळे येतात. अशी झाडे शेतात लावून पर्यटकांना आकर्षित करता येईल.

जागतिक कृषी पर्यटन दिन

दुर्मिळ वनस्पतींची नर्सरी

अनेक आयुर्वेदिक, दुर्मिळ वनस्पती अशा आहेत, ज्याची अनेकांना माहिती नाही. त्याची नर्सरी तयार करून वनस्पतीची माहिती शरीरातील कोणत्या आजारावर ती वनस्पती उपयोगी आहे, हे सांगितल्यास या वनस्पतीची विक्री होऊन रोजगार मिळेल.

फळांच्या बागा

एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या फळांच्या बागा तयार केल्यास त्यातही पर्यटक येतील. एकंदरीत कृषी पर्यटनाच्या अनुषंगाने विचार करून शेतीला कृषी पर्यटन व्यवसायाची जोड दिल्यास शेतकऱ्यांचा माल शेतातच विकला जाईल, गावातील अनेकांना रोजगारही मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com