esakal | भीषण दुर्घटना; कार-दुचाकीच्या अपघातात तीन ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

भीषण दुर्घटना; कार-दुचाकीच्या अपघातात तीन ठार

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव : जळगाव- औरंगाबाद मार्गावर (Jalgaon-Aurangabad Highway)पाळधी (ता. जामनेर)पासून एक किलोमीटर अंतरावर सुसाट कार (car) आणि दुचाकीच्या (Two-wheeler) समोरासमोर झालेल्या धडकेत (Accident) कारचालकासह दुचाकीवरील दोघे असे तीन जण ठार (Death) झाले. ही घटना सोमवारी घडली.

( jalgaon aurangabad highway car two wheeler accident three death)

हेही वाचा: जळगाव मनपात बंडखोर नगरसेवकांचा पून्हा भाजपला दे धक्का!

दुचाकीवरील पंकज मोहन तायडे (वय ३२, रा. कला वसंतनगर, आसोदा रेल्वेगेट, जळगाव) व धनंजय गंगाराम सपकाळे (वय ४२, रा. स्टेट बँक कॉलनी, जळगाव) यांच्यासह कारचालक प्रवीण प्रकाश पाटील (वय ३८, रा. भराडी) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. दुचाकीस्वाराचा मांडीपासून पाय उडून रस्त्याच्या दूर २० फूट लांब जाऊन पडल्यावरून या भीषण अपघातग्रस्त वाहनांच्या वेगाचा अंदाज येईल....असा घडला अपघात
शेंदुर्णी (ता. जामनेर) येथून फॉर्च्युन फायनान्स बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स एक्झिक्युटिव्ह पंकज तायडे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १९, डीआर १४१९) कर्जपुरवठा आणि सर्वेक्षणासाठी गेले हेाते. काम आटोपून जळगावकडे परत येत होते. जळगावहून पहूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर (एमएच १९, सीयू ७१६१) या सुसाट कारने समोरून येत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. पाळधीपासून जवळच बळीराजा ढाब्याजवळ हा अपघात झाला.


वाहनांचा प्रचंड वेग
अपघातातील दोन्ही वाहनांचा प्रचंड वेग आणि अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वारासह मागे बसलेल्याचे हात व पाय शरीरापासून वेगळे होऊन त्याचे तुकडे २०-२५ फुटांवर फेकले गेले. यात दुचाकीवरील पंकज तायडे व धनंजय सपकाळे जागीच ठार झाले, तर कारचालक प्रवीण पाटील याचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती कळाल्यावर पहूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेहांना जळगाव जिल्‍हा रुग्णालयात रवाना करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा: पंजाबचे जालंधर शहर पर्यटनासाठी आहे खास; जाणून घ्या माहिती


जामनेर रोडवर रुग्णवाहिका नाही
जिल्ह्यात केवळ धरणगाव-पाळधी ते बांभोरीपर्यंत कोठेही अपघात घडला, तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ॲम्ब्युलन्सची सुविधा मिळते. मात्र, शहराच्या चारही दिशेला कुठेही अशी व्यवस्था नाही. अजिंठा चौकातूनही मृतदेह चक्क मालवाहू गाड्यांमध्ये टाकूनच आणावे लागतात. परिणामी, आजही मालवाहतूक गाडीतून मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

व्हिडिओ, फोटो व्हायरल...
अपघातानंतर ग्रामस्थ तरुण मृतदेह उचलत असताना काहींनी त्याचे शूटिंग व फोटोही काढले. एरवी रेल्वे अपघातात होतात, तसेच शरीराचे तुकडे गोळा करून आणावे लागले, इतका भीषण अपघात असल्याचे व्हिडिओ व्हॉट्‌सॲपवरून व्हायरल झाले. थोड्याच वेळात मृतांची ओळख पटल्यावर जळगाव शहरातील आसोदा रोड, स्टेट बँक कॉलनीसह परिचित, नातेवाइकांनी जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली.

कुटुंबीयांचा आक्रोश
मृत पंकज मोहन तायडे याच्या मागे पत्नी हेमांगी, आई प्रमिला, वडील तायडे, अडीच वर्षीय मुलगा जयवीर, भाऊ सूरज, वहिनी अर्चना असा परिवार आहे. व्यवस्थापक धनंजय सपकाळे यांच्या मागे पत्नी पूनम, मुलगी, दोन मुले, आई आणि माजी सैनिक वडील गंगाराम असा परिवार आहे. दोघांच्याही कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. चालक प्रवीण पाटील मूळ भराडीचे रहिवासी असून, प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांच्या मागे पत्नी अनितासह मुलगी, दोन मुले आहेत.


हेही वाचा: पाऊस लांबल्याने खौशीकरांना पाणी टंचाईची भिती


जळगाव औरंगाबाद ठरतोय मृत्यूचा मार्ग
गेल्या चार ते पाच वर्षांपासून जळगाव- औरंगाबाद महामार्गाचे काम प्रलंबित होते. डांबरी रस्त्यांचे आयुष्य कमी असल्याने याठिकाणी सिमेंट काँक्रिटचा चौपदरी महामार्ग तयार करण्यात आला. या महामार्गावर अजूनही काही ठिकाणी पूल व मोऱ्यांचे कामे सुरू असून, एकाच बाजूने दोन्हीकडील वाहतूक वळवली जाते. त्यातूनच वाहने एकाच मार्गावर आल्याने अपघात घडल्याचे बोलले जात आहे. प्रचंड वेगात काँक्रिटच्या मार्गावर टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे हा महामार्ग धोकादायक ठरतोय.

loading image