
लग्नाबाबत फसवणूक प्रकरणी जळगावच्या दांपत्याला पकडले
धुळे : लग्न लावत तरुणांची फसवणूक करणाऱ्या जळगाव येथील दाम्पत्याला पीडित कुटुंबासह शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आर्वी (ता. धुळे) येथील नवा मारोती चौकातील सचिन रमेश चौधरी या तरुणाचे २ फेब्रुवारीला विद्यानगर (भुसावळ, जि. जळगाव) येथील प्रिया नवल पवार हिच्याशी श्री एकवीरादेवी मंदिरात लग्न झाले. तशी न्यायालयात नोंदणीही करण्यात आली. लग्न जमण्यासाठी जळगावच्या एजंटला दीड लाख रूपये दिले. लग्नानंतर आठ दिवसांत प्रिया पळून गेली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन चौधरी आणि कुटुंबियांनी शोध सुरु केला; मात्र जळगावचा एजंटही बेपत्ता झाला.
मालेगावमध्येही फसवणूक
दरम्यान, सागर रमेश पवार (रा. मालेगाव) याचीदेखील अशाच पद्धतीने फसवणूक झाली होती. २३ ऑगस्ट २०२० ला जळगावच्या सुनीता नावाच्या तरुणीशी एजंटच्या माध्यमातून त्यांचे लग्न झाले. तीदेखील आठ दिवसांत ३५ ते ४० हजार रूपयांचा ऐवज घेऊन पळून गेली. सागरचा भाऊ योगेश याचा नाशिकच्या बस्ते नावाच्या एजंटशी परिचय होता. त्याने जळगावच्या एजंटचे नाव सुचविले. हमी घेत त्यातून विवाह झाला. फसवणूक झाल्याने योगेशदेखील गेल्या दोन वर्षांपासून एजंटचा शोध घेत हेाता. आर्वीच्या सचिनने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यात एजंटचा फोटोही होता. त्यावरून योगेश हा सचिन चौधरी याच्याकडे पोचला. मात्र, तोपर्यंत त्याचीसुद्धा फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. दोघांनी शोध सुरु ठेवला.
असा रचला सापळा
सचिन चौधरी यांनी पंचायत समिती सदस्य दिलीप देसले आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या हेमा हेमाडे यांच्याशी संपर्क साधत आपबिती सांगितली. त्यावर त्यांनी जळगावच्या एजंटचा मोबाइल नंबर मिळविला. हेमा हेमाडे आणि दिलीप देसले यांनी लग्नासाठी आम्हाला मुलगी मिळवून द्या, अशी गळ एजंटला घातली. सुरवातीला त्यांनी टाळाटाळ केली. पण, नंतर होकार दिला. खासगी वाहनाने हेमाडे, आशा पाटील, प्रतीभा सोनवणे, देसले, सचिन चौधरी आणि योगेश पवार जळगावच्या त्या एजंटच्या घरी गेले. शनिवारी (ता. २६) सकाळी दोघांना ताब्यात घेत येथील तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित संदीप पाटील आणि करुणा पाटील असे त्या एजंट दाम्पत्याचे नाव आहे.
Web Title: Jalgaon Couple Caught By Women Activists Of Shiv Sena Marriage Fraud Case Dhule
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..