जळगाव : जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींमध्‍ये अंधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

light

जळगाव : जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींमध्‍ये अंधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आता १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट मिळत आहे. यामुळे ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्‍या जात आहेत. असे असले तरीदेखील लाखो रुपयांच्या निधीतून विकासाचा गाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायतींना साधी विजेची व्यवस्था करता आलेली नाही. जिल्ह्यातील अशा ६७ ग्रामपंचायतींना आतापर्यंत वीजजोडणीच नाही. अर्थात या ग्रामपंचायतींना वीजमीटरच नसल्‍याची माहिती समोर आली आहे.

ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात, या हेतूने केंद्राकडून कोट्यवधींचा निधी ग्रामपातळीवर दिला जात आहे. असे असतानादेखील ग्रामपंचायतींना गावाचा विकास साधता येत नसल्‍याचे वास्‍तव पाहण्यास मिळत आहे. यात प्रामुख्‍याने ग्रामपंचायतींमध्ये साधी विजेची देखील व्यवस्था नाही; अशा ६७ ग्रामपंचायती जिल्ह्यात आहे. सर्वाधिक १५ ग्रामपंचायती भुसावळ तालुक्यातील आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात एकूण ३९ ग्रामपंचायती आहे. एरंडोल तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतीत अंधार आहे. तर जळगाव तालुक्यात देखील नऊ ग्रामपंचायतींना वीजजोडणी नाही.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

मग ग्रामपंचायत ऑनलाइन कशी

आज ग्रामपंचायती हायटेक करण्याच्‍या हेतूने ग्रामपंचायतीत संग्राम सॉफ्ट, इंटरनेट सुविधा उपलब्‍ध केल्‍या आहेत. प्रामुख्‍याने प्रत्‍येक ग्रामपंचायत संगणकीय करत ग्रामस्‍थांना तेथूनच ऑनलाइन दाखले उपलब्‍ध करण्याची सुविधा केली आहे. परंतु, ६७ ग्रामपंचायतींना वीजजोडणीच नाही; तर संगणकीय कामकाज चालते कसे? हा प्रश्‍न उद्‌भवत आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायती

अमळनेर- दोन, भडगाव- दोन, भुसावळ- १५, चाळीसगाव- चार, एरंडोल- १२, जळगाव- नऊ, जामेनर- एक, पाचोरा- १३, पारोळा- चार, रावेर- तीन, यावल- दोन.

loading image
go to top