Jalgaon District bank Election : देवकर, डॉ. पाटील, खडसेंचा आज फैसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District bank Election : देवकर, डॉ. पाटील, खडसेंचा आज फैसला
Jalgaon District bank Election : देवकर, डॉ. पाटील, खडसेंचा आज फैसला

Jalgaon District bank Election : देवकर, डॉ. पाटील, खडसेंचा आज फैसला

जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत दहा जागांसाठी ९४.८ टक्के मतदान झाले. दोन हजार ८५३ मतदारांपैकी दोन हजार ६८४ मतदारांनी आपला हक्क बजावला. मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक शंभर टक्के मतदान झाले. सोमवारी (ता. २२) जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालकपदाच्या दहा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यात १५ तालुक्यांत मतदान केंद्र होते.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे नेते एकनाथ खडसे यांनी सकाळी अकराच्या सुमारास मुक्ताईनगर केंद्रावर मतदान केले, तर सहकार पॅनलचे गुलाबराव देवकर यांनी जळगावात सु. ग. देवकर शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान केले. सकाळी दहापर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सरासरी २३ टक्के मतदान झाले होते. दुपारी बारापर्यंत ५३ टक्के, तर दुपारी दोनपर्यंत ७८ टक्के मतदान झाले होते.

मतदान केंद्राबाहेर नेत्यांची गर्दी

जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या बाहेर नेत्यांची गर्दी दिसून आली. सहकार आघाडीचे नेते मतदान केंद्रांना भेटी देताना दिसून आले. जळगाव येथील सु. ग. देवकर मतदान केंद्राच्या बाहेर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, काँग्रेसचे महानगराध्यक्ष श्‍यामकांत तायडे, माजी महापौर ललित कोल्हे, मनोज चौधरी, शिवसेना जिल्हा महानगरप्रमुख शरद तायडे, महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते.

हेही वाचा: लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राची नवी आयडीया; लकी ड्रॉ आणि इतर उपक्रमांचा घेणार आधार

आज मतमोजणी

निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. २२) सकाळी आठपासून जिल्हा बँकेच्या सभागृहात होणार आहे. दुपारी एकपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजप नेत्याचे मतदान

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, त्यांनी मतदानात सहभाग घेतला. भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला, तर चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मात्र, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी मतदान केले नाही, ते बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले.

तालुकानिहाय झालेले मतदान (कंसात एकूण मतदान)

जळगाव : (४००) ३६६, भुसावळ : (१३९) १३४, यावल : ३३३ (२९५), रावेर : (३००) २८२, मुक्ताईनगर : (७६) ७६, बोदवड : (६०) ५९, जामनेर : (२०७) १८७, पाचोरा : (१८३) १७२, भडगाव : (१२८) १२७, चाळीसगाव : (१८३) १७६, पारोळा : (१९४) १८१, अमळनेर : (१८६)१७८, चोपडा : (२१६) २१४, धरणगाव : (१३८) १३३, एरंडोल : (११०) १०४.

देवकर, डॉ. पाटील, खडसेंचा फैसला

जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे, रावेरचे माजी आमदार अरुण पाटील, अरुणा दिलीप पाटील, विकास पवार आदींच्या भाग्याचा फैसला होणार आहे.

loading image
go to top