
नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज रहा : जिल्हाधिकारी राऊत
जळगाव : मॉन्सून काळात उद्भवणाऱ्या वीज, अतिवृष्टी, पूर, महापूर, दरड कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. आपत्कालीन काळात होणारी जिवीत व वित्त हानी टाळणे शक्य होईल. यासाठी सर्व यंत्रणांनी सज्जता ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज येथे दिल्या.
मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आज (ता.१०) जिल्हा नियोजन सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. विभागनिहाय आराखडे, एसओपी अद्ययावत करावे, विभाग निहाय नियंत्रण कशाची स्थापना करावी व 24×7 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करावी, आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची तपासणी करून सर्व साहित्य सज्ज ठेवावे व सर्व विभागांनी यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवावा व येणाऱ्या संभाव्य आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.
हेही वाचा: जळगाव : जिल्हा रुग्णालयातील मारहाण प्रकरणी चार पोलिस निलंबित
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग, सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, पोलिस विभाग व होमगार्ड विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, जलसंपदा, महावितरण, महापारेषण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, परिवहन विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात प्रामुख्याने नदीकाठच्या गावांबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील तापी, गिरणा, वाघूर या प्रमुख नदी काठच्या गावांबाबत प्राधान्याने सतर्क राहावे. छोटे नाले, ओढे, नद्या यांना अचानक येणाऱ्या पुराच्यावेळी दुर्घटना घडू नये, यासाठी दक्षता घ्यावी. ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अतिपर्जन्याची शक्यता आहे, तसेच गेल्या वर्षात ज्या- ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणी स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, शाळा, समाज मंदिर, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत. त्या जागी औषधी, पाणी, जेवणाची व्यवस्था राहील याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने छोटे/मोठे पुलांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या काठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षणाचे उपाय योजावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती कामे पूर्ण करावीत. धरणे, पाझर तलाव या ठिकाणी चोवीस तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. पूरप्रणव क्षेत्र/गावे याबाबत लाल व निळ्या गावांबाबत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेसह सतर्क राहावे. नदीपात्रात अतिक्रमणे असल्यास तत्काळ काढण्यात यावीत.
हेही वाचा: स्पर्धा करायचीच तर विकासाची करा, घाण राजकारण सोडा ! : गुलाबराव पाटील
हवामान खात्याच्या संपर्कात राहून दक्षतेचे इशारे, सुरक्षेची उपाययोजना म्हणून वेळेत सर्व यंत्रणा व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी. तसेच राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपर्कात राहावे. त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती करून घ्यावी. महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाई, ड्रेनेज, पाइपलाइन दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी. धोकादायक व अनधिकृत होर्डिंग ताबडतोब काढावेत इत्यादी सूचना देण्यात आल्या.
बैठकीत पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांनी सादरीकरण केले. नायब तहसीलदार अमित भोईटे, महसूल सहायक सुनील पवार, मोहनीश बेंडाळे यांनी सहकार्य केले.
Web Title: Jalgaon District Collector Raut Raut Orders To Officers Be Ready To Face Natural Calamities
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..