
जळगाव : महामार्गावर गतिरोधकासाठी रास्ता रोको आंदोलन
जळगाव : येथील महामार्गाच्या चौपदरीकरणात सालारनगर अंडरपास मंजूर झाला नाही, अंडरपास ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात मोठा बोगदा करण्याचे लिखित आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही, जुन्या अंडरपास ब्रिजमधून शाळेचा रास्ता तयार करून दोघी सर्विस रोड तयार करून देण्याचे आश्वासन देऊनही राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्पप्रमुख चंद्रकांत सिन्हा यांनी ते केले नाही. यामुळे मंगळवारी (ता. २१) जिल्हा मनियार बिरादरीतर्फे महामार्गावर रास्तारोको आंदेालन करण्यात आले. यामुळे तब्बल अर्धातास महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती.
साहाय्यक पोलिस अधीक्षक चिंता, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिकारेंसह राष्ट्रीय महामार्गाचे विश्वजय बागळकर यांना निवेदन देणयात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी मोबाईलद्वारे शेख व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिकारे यांना आश्वासन दिले, की संध्याकाळपर्यंत दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात येईल. रैम्पचे कामसुद्धा दोन दिवसात पूर्ण होईल. यामुळे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.