Jalgaon: अवैध वाळू वाहतूक उठली जिवावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

जळगाव : अवैध वाळू वाहतूक उठली जिवावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट येत असलेला ट्रॅक्टर अचानक शिवकॉलनी रिक्षा स्टॉपकडे वळण घेतो अन्‌ उभ्या रिक्षाला चिरडून तिच्यावर चढतो, हे कमी म्हणून की काय दुसरा ट्रॅक्टर शेजारून धडकतो. जिवाचा थरकाप उडविणाऱ्या या अपघातात सुदैवाने रिक्षात प्रवासी नव्हते आणि चालक बाहेर उभा असल्याने तो बचावला. मात्र, वाळूउपसा बंद असल्याच्या ‘कलेक्टोरेट’च्या दाव्यांना या अपघाताने पुरते नागवे केले आहे.

गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू भरलेल्या सुसाट विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने अचानक शिवकॉलनी रिक्षा स्टॉपकडे वळण घेत महामार्गाच्या बाजूला प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभ्या रिक्षा (एमएच १९, व्ही ३४४१) या वाहनाचा चेंदामेंदा करत त्यावर चढले. भरदिवसा गर्दी असलेल्या शिवकॉलनी स्टॉपवर हा अपघात घडल्याने एकच धावपळ उडाली असताना, मुरमाने भरलेला दुसरा ट्रॅक्टर समोरून आला अन् तोही त्या रिक्षावर आदळला. जिवाचा थरकाप उडविणाऱ्या या अपघातामुळे एकच कल्लोळ माजून शिवकॉलनी स्टॉपवर गर्दी उसळली.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

चालक बचावला

पिंप्राळा येथील मजहरखान सकावत खान (वय ३०, रा. पिंप्राळा) हा तरुण संबंधित रिक्षा चालवतो. दुपारच्या जेवणाची वेळ होत असल्याने मजहरखान हा पिंप्राळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या शोधात होता. इतक्यात एक सुसाट ट्रॅक्टर उभ्या रिक्षावर चढले. लगेच दुसरेही ट्रॅक्टर आदळले.

वाळूमाफियांना रान मोकळे

सत्ता कोणाचीही असो बेकायदेशीर वाळूचा उपसा करून त्याचा अवैध धंदा करणारे वाळूमाफिया मोकाट आहेत. त्यांच्याबाबत सत्ताधारी असो की विरोधी, कोणीच ‘ब्र’ काढत नाही. जिल्ह्यातील सर्वच वाळू ठेके पूर्णतः बंद असताना जळगाव शहरात वाळूउपसा होतोच कसा, या प्रश्नाचे उत्तर जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी जनतेला द्यावे, अशी मागणी सामान्यांकडून होत आहे.

loading image
go to top