Jalgaon Lok Sabha Election : ‘कमळ’च उमेदवार, विजयाचे दायित्व कसे नाकारणार?

Lok Sabha Election : जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघांतून भाजपने उमेदवार जाहीर केले असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत.
Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election esakal

Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघांतून भाजपने उमेदवार जाहीर केले असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. भाजपच्या या दोन्ही उमेदवारांनाही निवडणुकीसाठी ‘सहज चाल’ मिळाली नसेलच... दोन्ही नावे अनपेक्षित असली तरी आश्चर्यकारक मुळीच नाहीत. या नावांना ‘पसंती’ आहे किंवा नाही, यापेक्षाही आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही जागांवर विजय होईल, याचे दायित्व गिरीश महाजनांसह भाजप नेत्यांवर असेल, हे नाकारून कसे चालेल? (Jalgaon Lok Sabha Election Kamal candidate marathi news)

भाजपसाठी बालेकिल्ला राहिलेल्या जळगाव जिल्ह्यात सारे आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही. एकनाथ खडसे भाजपत असताना त्यांच्यात व गिरीश महाजनांमध्ये कधीही सख्य राहिले नाही. जिल्ह्यातील वर्चस्वाच्या स्पर्धेतून दोघांमध्ये नेहमीच संघर्ष उडाला आहे. त्यांच्यातील संघर्षाची झळ संघटनेपर्यंत, पक्षातीलच कार्यकर्त्यांपर्यंत पोचली... त्यातून पक्षाची त्या वेळीच दोन शकले झालीत.

पुढे जाऊन खडसेंनी पक्ष सोडला व ते कन्या रोहिणी यांच्यासह शरद पवारांच्या छत्रछायेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेत. आता पक्ष, विचारच भिन्न झाल्यानंतर खडसे-महाजनांनी एकमेकांविरुद्ध थेट युद्धच पुकारले. खडसेंनी भाजप सोडल्यानंतर खरेतर भाजपची जिल्ह्यातील कमान एकहाती महाजनांकडे आली. त्यातून पक्षात समन्वय, सामंजस्य कायम राहील; नव्हे वाढेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, तसे झालेले दिसत नाही. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाजनांकडे पुन्हा मंत्रिपद आले आणि त्यांचा व्याप वाढला. संकटमोचक त्यांचे काम राज्यव्यापीही झाले. त्यामुळे जिल्ह्यातील संघटनेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले, शिवाय पक्षांतर्गत कुरघोड्यांवरही त्यांचे नियंत्रण राहिले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर तर भाजपतील अंतर्गत गटबाजीचा प्रत्यय वारंवार येऊ लागला.

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election News : निवडणुकीत विविध परवान्यांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

रावेर व जळगाव मतदारसंघात पक्षाचा उमेदवार कोण असावा, यावर बराच खल झाल्यानंतर रावेरमधून रक्षा खडसे व जळगावातून स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित झाली. या उमेदवारीबाबत महाजनांच्या पसंतीने आणि महाजनांच्या शिफारशीविरोधात असे भाजपत व राजकीय वर्तुळातही दोन मतप्रवाह आहेत. त्याचे उत्तर खरेतर पक्षाचे शीर्ष नेतृत्वच देऊ शकेल.

अर्थात, महाजनांकडेही त्याचे उत्तर असेलच; मात्र, त्यांनी त्याचे खरे उत्तर दिल्यानंतरही त्यांच्यावर कुणी विश्‍वास ठेवेल, ही शक्यता तशी कमीच. एक मात्र नक्की, की उमेदवारांची नावे निश्‍चित होताना महाजनांना ‘ही नावे फायनल करतोय’ असा निरोप गेला असणारच. शीर्ष नेतृत्वाच्या निर्णयाबद्दल आक्षेप वा नाराजी व्यक्त करण्याची क्षमता पक्षात अगदी देशपातळीवरही कुणाची नाही, हे वेगळे सांगायला नको. असो..

भाजपत एकदाचे उमेदवार निश्‍चित झाले. अपेक्षेप्रमाणे रावेर मतदारसंघात रक्षा खडसेंच्या उमेदवारीविरोधात पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे वादळ उठले. या वादळाची झळ प्रदेशापर्यंत पोचली असणारच. त्यावर महाजनांनी बैठक घेऊन वादळ शांत करण्याचा प्रयत्न केला. वरवर ते शांत झाल्याचे दिसत असले तरी, खडसे या नावामुळे रक्षा यांच्याबद्दलची नाराजी दूर होणे अशक्यच.  (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election 2024 : निवडणूक खर्चालाही महागाईची झळ; उमेदवाराला 95 लाखांची मर्यादा

त्यामुळे मतदान होईपर्यंत ही खदखद कायम राहणार. ‘अब की बार चारसौ पार’, असा नारा देत आणि ‘कमळच आमचा उमेदवार’ असा संकल्प करत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बघू पाहणाऱ्या भाजपला एकेका जागेचे महत्त्व असल्याने दोन्ही जागा ‘काही केल्या’ निवडून आणायचे दायित्व जिल्ह्याचे नेते म्हणून महाजनांना स्वीकारावे लागेल.

त्यांचा जामनेर मतदारसंघ रावेर लोकसभा क्षेत्रात येत असल्याने हे दायित्व अधिकच आणि त्यांनी ते स्वीकारलेय, असे दिसते. तर पश्‍चिम भागात जळगावच्या जागेवरील विजयाची हमी महाजनांचीच सध्या ‘सावली’ बनलेले आमदार मंगेश चव्हाणांनी घेतलीय. उमेदवार पसंतीचे आहेत की नाही, ही बाब तात्पुरती बाजूला ठेवावी लागेल, हे या सर्वांना सांगणे न लगे!

‘त्या’ वेळेसारखी आता स्थिती नाही!

उमेदवारांविषयी नाराजीवरून अद्यापही या दोन्ही मतदारसंघांत उमेदवार बदलांविषयी चर्चा सुरू आहे, तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यासाठी २०१४ च्या रावेर व २०१९ च्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलाचा दाखलाही दिला जातोय. या दोन्ही वेळी दोन्ही मतदारसंघांत ऐनवेळी उमेदवार बदलून नव्या उमेदवारास कमी वेळ मिळूनही ते विजयी झालेत.

पण, त्या दोन्ही वेळच्या निवडणुकीसारखी आताची स्थिती नाही. २०१४ व २०१९ ला पूर्णपणे मोदी लाट होती. आताही इतर कोणत्याही नेतृत्वापेक्षा मोदींच्या नावाचे गारुड जनमानसावर अधिक आहे, पण त्यावेळसारख्या लाटेची स्थिती नाही. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार बदलून, नवखा उमेदवार देऊन, कमी वेळेत प्रचार करून विजय कठीण करण्याची ‘रिस्क’ पक्षनेतृत्व घेणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे.

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : जामनेरमध्ये भाजपची तयारी; महाविकास आघाडीत शांतता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com