esakal | दीड वर्षापासून निधी नाही; जळगाव जिल्ह्यातील रस्ते, पुलांची हजार कोटींची कामे ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

road work

जळगाव जिल्ह्यातील रस्ते, पुलांची हजार कोटींची कामे ठप्प

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : रस्ते, पुलांची जिल्ह्यातील नवीन कामे तर दूरच, पण दीड वर्षापूर्वी मंजूर हजार कोटींची कामेही निधीअभावी होऊ शकलेली नाहीत. या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Department of Public Works jalgaon) अवघ्या शे-दोनशे कोटींचा निधीच मिळू शकला असून, अगदी देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठीही निधी मिळणे दुरापास्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (lockdown-no-fund-district-and-development-work-stop-last-year)

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह (Jalgaon national highway) राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राज्य व जिल्हा मार्ग मिळून १८ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. पैकी बांधकाम विभागांतर्गत साडेपाच हजार किलोमीटरचे रस्ते आहेत.

हेही वाचा: डॉक्‍टर असल्‍याचे भासवत उपचार; कोरोना काळातही जीवाशी खेळ

दीड वर्षापासून कामे ठप्प

दर वर्षी जिल्ह्याला नवीन रस्ते व आहे त्या रस्त्यांसह पुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सरासरी पाचशे ते हजार कोटींचा निधी मिळत असतो. परंतु गेल्या दीड वर्षापासून कोणतेही नवीन काम अथवा देखभाल- दुरुस्तीसाठीही निधी मिळालेला नाही. त्यामुळे साधारण डिसेंबर २०१९ पासून जिल्ह्यात एकही नवीन काम होऊ शकलेले नाही.

हेही वाचा: काळ नव्हता; पण वेळ खराब होती

हजार कोटींची कामे मंजूर

जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून हजार कोटींची कामे मंजूर आहेत. यात काही नवीन रस्ते, जुन्या रस्त्यांची व पुलांची दुरुस्ती, नूतनीकरण यांसह अन्य कामांचा समावेश आहे. वार्षिक अंदाजपत्रकात या कामांसाठी निधीची तरतूद झालेली आहे. परंतु सरकारने शे- दोनशे कोटींच्या वर निधीही उपलब्ध करून दिलेला नाही. पाच-दहा कोटींचा निधी येतो; परंतु तो आधीच्या कामांची देणी म्हणून दिला जातो. नवीन कामे त्यात होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.

‘ब्रेक’ सरकारचा की कोरोनाचा?

दीड वर्षापासून कामे ठप्प आहेत. हजार कोटींच्या मंजूर कामांनाही मुहूर्त लागत नाही. शासनाकडून निधीच नाही, असे सांगितले जाते. वर्षभरापासून कोरोनामुळे अर्थचक्र ठप्प असल्याने निधीची कमतरता असणे स्वाभाविक आहे. परंतु याच काळात अन्य जिल्ह्यांमध्ये, विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात निधी वितरित झाला. जळगाव जिल्ह्यातील निधी, कामांना मात्र ‘ब्रेक’ लागला आहे.