
Jalgaon Municipal Corporation : महापालिकेत 2 आयुक्त, खुर्चीवर मात्र कोणीच नाही!
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत दोन आयुक्त आहेत. मात्र, खुर्चीवर एकही आयुक्त बसलेले दिसत नाहीत. अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय घोळात कोणताही कामाचा ताळमेळ जमत नसल्याने सध्या तरी प्रशासकीय दृष्टीने महापालिका वाऱ्यावर आहे. मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत वानखेडे एकमेव अधिकारी सध्या महापालिकेत सर्वच विभागांचे काम पाहात असल्याचे दिसून येत आहे. (Jalgaon Municipal Corporation 2 commissioners in corporation lack of Administrative coordination Jalgaon News)
जळगाव महापालिकेचे आयुक्तपद अनोख्या पेचात अडकले आहेत. डॉ. विद्या गायकवाड यांच्या झालेल्या बदलीला स्थगिती आहे. मात्र, त्यांना पदभार घेता येत नाही. रुजू झालेले आयुक्त देवीदास पवार यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार आहे. मात्र, त्यांनी धोरणात्मक निर्णयावर स्वाक्षरी करावयाची नाही. याबाबत शासनाचे कोणतेही ठोस आदेश नाहीत, अशा कठीण परिस्थितीत महापालिकेत दोन्ही आयुक्तांपैकी एक आयुक्त त्यांच्या दालनात खुर्चीवर बसलेले दिसत नाहीत.
फायली सहीविना
महापालिकेत नवीन रुजू झालेले आयुक्त देवीदास पवार सोमवारी (ता. ५) दुपारनंतर आपले कार्यालय सोडून गेले आहेत. ते मंगळवारी (ता. ६) आले नाहीत. ते कोणत्या कामासाठी बाहेर आहेत, याबाबत कोणीतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत दोन दिवस आयुक्त कार्यालयातून कोणत्याही फाइलवर सही झाली नसल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
डॉ. गायकवाडांना आदेशाची प्रतीक्षा
डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीला ‘मॅट’ने स्थगिती दिली आहे. मात्र, त्यांनी पदभार घ्यायचा की नाही, याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे त्यात आदेश येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
चंद्रकांत वानखेडे एकमेव अधिकारी
महापालिकेत दोन्ही आयुक्तांना पदभार घेता येत नाही. शहर अभियंता गिरगावकर रजेवर आहेत. उपायुक्त प्रशांत पवार यांची बदली झाल्याने ते निघून गेले आहेत. सहाय्यक आयुक्त बाविस्कर यांचे लग्न असल्यामुळे ते सुटीवर आहेत. त्यामुळे सध्या मुख्य लेखाअधिकारी चंद्रकांत वानखेडे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सध्या सर्वच विभागांचा प्रभारी पदभार आहे. मंगळवारी त्यांच्या उपस्थितीत शहरातील गोवरच्या साथीबाबत बैठकही घेण्यात आली.
दोन मंत्री, तरीही प्रश्न सुटेना
राज्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याचे दोन मंत्री आहेत. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, तर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील आहेत. विशेष म्हणजे राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश भोळे आहेत. तरीही महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार कुणी घ्यायचा, हा घोळ सुटत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे काय सुरू आहे, हा प्रश्न पडला आहे.