
Nashik News : चिखलओहोळ आरोग्य केंद्रात एकदिवसीय बाळाच्या मृत्यूने खळबळ!
मालेगाव (जि. नाशिक) : चिखलओहोळ (ता. मालेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत शेतमजूर महिलेच्या एक दिवसीय जन्मजात सुदृढ असलेल्या बाळाचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या बाळाचा जीव गेल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी रुग्णालयाला कुलूप ठोकले.
अधिकाऱ्यांना घेराव घालत आरोग्य यंत्रणेच्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. सायंकाळी तालुका पोलिस, सामाजिक कार्यकर्ते व विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यातून या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध हाेत असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. (tension due to death of one day old baby in chikhal ohol health center Nashik Latest Marathi News)
शिंगणापूर (जि. परभणी) येथून पोटाची खळगी भरण्यासाठी शांताराम भामरे यांच्या शेतात कामाला आलेल्या शेतमजूर महिला सोनाली दिलीप शिंदे (वय ३५) यांची मंगळवारी (ता.६) सकाळी आरोग्य केंद्रात सुरळीत प्रसुती झाली. बाळाचे वजनही साडेतीन किलो आले. मुलगा झाल्याने मुलाची आई सोनाली व आजी यशोमती धायडे या आनंदात हाेत्या. त्यांचा हा आनंद क्षणीक ठरला. सकाळी प्रसुती झाली त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. दुपारनंतर अनेकांनी घरचा रस्ता धरला. यातच दुपारी पाऊणेचारच्या सुमारास दुध पीत असताना बाळ झटके देवू लागले.
मुलाच्या आईने आरडाओरडा केला. मात्र रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारीही नव्हते. वेळेवर उपचार न मिळाल्याने चारच्या सुमारास बाळाचा मृत्यू झाला. ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालय आवारात आंदोलन सुरु करत रुग्णालयाला कुलूप ठोकेले. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थ संतप्त भावना व्यक्त करीत होते. एकही डॉक्टर उपस्थित नसल्यानेच बाळाचा जीव गेला अशी ग्रामस्थांची भावना होती.
हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
प्राथमिक आरोग्य केंद्रात आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील देवरे, सरपंच राजश्री बोरसे, उपसरपंच रोहिनी देशमुख, तंटामुक्तीचे अध्यक्ष ईश्वर चव्हाण हे देखील घटनास्थळी पोहोचले. तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. व्ही. शिंदे दाखल झाले. संबंधितांनी ग्रामस्थांना दोषींवर तातडीने कारवाई करण्याची व या घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी समजूतदारपणा दाखवत आंदोलन मागे घेतले. आंदोलनात अर्जुन भामरे, राहुल देशमुख, नितीन शिंदे, गोरख अहिरराव, नारायण खैरनार, बाळासाहेब मगरे, नितेश देशमुख आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.
"चिखलओहोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर व कर्मचारी नियुक्त आहेत. गोवर व रुबेलाच्या बैठकीसाठी आपण आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो. घटनेची माहिती मिळताच विस्तार अधिकारी बी. व्ही. शिंदे यांना आरोग्य केंद्रात पाठविले. या प्रकरणी सविस्तर चौकशी करु. चौकशी अहवाल व सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करु." - डॉ. निलेश सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी