Jalgaon Municipality recovery | जळगावकरांकडे 236 कोटींची घरपट्टी थकबाकी : आयुक्त देवीदास पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Municipality recovery | जळगावकरांकडे 236 कोटींची घरपट्टी थकबाकी : आयुक्त देवीदास पवार

जळगाव : शहरातील मिळकतधारकांकडे महापालिकेची २३६ कोटींची घरपट्टी थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी आता व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे.

थकबाकीदारांचे नळ संयोजन बंद करणे, तसेच जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त देवीदास पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेला उपायुक्त गणेश चाटे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र पाटील, प्रभाग एकचे अधिकारी नरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. (Jalgaon Municipality recovery 236 crores due to Jalgaon residents Commissioner Devidas Pawar news)

आयुक्त पवार यांनी सांगितले, की महापालिकेची नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकबाकी आहे. ८८ कोटी मागील आहे. १४८ कोटी या वर्षाची, अशी एकूण २३६ कोटी थकबाकी आहे. घरपट्टी वसुली कमी होत असल्यामुळे महापालिकेकडे निधीचा अभाव आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. ही वसुली वाढविण्यासाठी महापालिकेतर्फे मोहीम राबविण्यात येणार आहे.

ऑफलाईन, ऑनलाईन सुविधा

महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन वसुली करण्यात येणार आहे. यासाठी अभियंत्यासह सर्व अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. याशिवाय घरबसल्या रक्कम भरण्यासाठी महापालिकेतर्फे फोन पे, गुगल पे, डेबीट, क्रेडिट कार्ड, नेट बँकीग या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

थकबाकीदारांवर कारवाई

थकबाकीदारांबाबत आयुक्त पवार म्हणाले, की सहा वर्षांपर्यंत थकबाकीदार काढले आहे. त्यात एक वर्षाचे ६,६६९, दोन वर्षांचे १८,१६१२, तीन वर्षांचे ५,५७०, चार वर्षांचे ५,४६०, पाच वर्षांचे २,३३२ आणि सहा वर्षांवरील ११,१७० मिळकतधारक आहेत.

रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदारांचे नळ संयोजन बंद करणे, तसेच जप्ती करणे, अशी कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अभय योजनेचा विचार

अभय योजनेबाबत ते म्हणाले, की अभय योजना राबविण्याचा महापालिकडे प्रस्ताव आला आहे. त्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. शिवाय गाळेधारकाकडील थकबाकी वसुलीबाबतही शासनाकडून माहिती मागविली आहे. त्याची वसुलीही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.