esakal | अकरावीची प्रवेशप्रक्रिया लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

11th std admission process

अकरावीची प्रवेशप्रक्रिया लॉकडाउन

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : सद्यःस्थितीत राज्यातील २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता अकरावी वर्गाच्या प्रवेशप्रक्रियेबाबत (11th std admission process) कोणतीही कार्यपद्धती अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तरी काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी २०२१- २२ यासाठी अकरावी वर्गाची प्रवेशप्रक्रिया सुरू केली असल्याचे निदर्शनास आले आहे. अजून दहावी परीक्षेचे भिजते घोंगडे असताना, अकरावी प्रवेशप्रक्रियेने विद्यार्थ्यांसह काही पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हे दूर करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी अकरावी वर्गाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश, तसेच शासनाचे स्पष्ट आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणतीही प्रवेशप्रक्रिया राबवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: जिवलग मित्र..कोठेही असायचे सोबत; मृत्‍यूनेही गाठले सोबतच एकाच ठिकाणी

राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या महापालिका क्षेत्रात दर वर्षी अकरावी वर्गाचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात, तर उर्वरित राज्यात अकरावी वर्गाचे प्रवेश स्थानिक पातळीवरून केले जातात. दर वर्षी अकरावी वर्ग प्रवेशप्रक्रिया साधारणपणे राज्य मंडळातर्फे इयत्ता दहावी परीक्षेचा निकाला जाहीर झाल्यानंतरच सुरू होते. मात्र २०२०-२१ या शैक्षणिक वर्षावर कोरोना महामारीचे सावट होते. त्यामुळे जास्तीचा काळ ‘शाळा कुलूपबंद’ होत्या. शासनाने यंदा दहावीची परीक्षा रद्द केल्या असल्या, तरी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यावर अजूनही विचारमंथन सुरू आहे.

हेही वाचा: रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना दणका; पैसे परत करण्याचे आदेश

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्यातील २०२१-२२ या वर्षासाठी अकरावी वर्गाच्या प्रवेशप्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही. तथापि, काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी प्रवेशप्रक्रिया सुरू करून त्यासाठी गुगल फॉर्मसारख्या सामाजिक माध्यमांद्वारे अर्ज मागविणे सुरू केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

शिक्षण संचालकांनी काढले पत्र

या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालक जगताप यांनी राज्यातील विभागीय शिक्षण संचालक, सर्व जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना पत्र काढून निर्देशित केले आहे. जोपर्यंत २०२१-२२ मधील अकरावी वर्गाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश, तसेच शासनाचे स्पष्ट आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणतीही प्रवेशप्रक्रिया न करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही उच्च माध्यमिक अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करू नये. विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल, अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना दिल्या जाऊ नयेत, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी व पालकांना याबाबत अवगत करण्याचेही या पत्रात नमूद केले आहे.